मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलात आता पोलिसांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी 'थर्ड आय' अॅप सज्ज झाले असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रथम पालघर जिल्ह्यातील पोलिसांच्या हालचालींवर वरिष्ठांमार्फत खास नजर ठेवण्यासाठी पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी 'थर्ड आय' नावाचे अॅप विकसित केले. प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलमध्ये ते टाकण्यात आले आहे. यामुळे ड्युटीवर असताना कुठे आहेत, गस्तीवर कुठे गेलेत त्याची इत्यंभूत माहिती पोलीस अधीक्षकांना मिळते. त्यामुळे कामचुकार पोलीस आणि हप्त्यासाठी बेकायदेशीर धंदेवाल्यांकडे जाणाऱ्या पोलिसांना यामुळे चाप बसला आहे. याची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयातून हे अॅप संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यातील हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य नसते. हे पोलीस डयुटीवर असताना गस्तीसाठी नेमके कुठे गेले, ते खरच गस्तीवर गेलेत का हे कळत नाही. गस्तीसाठी पोलीस निघतात. मात्र, ते खरंच त्या ठिकाणी गस्त घालतात का याचीही काही नोंद नसते. गस्तीच्या नावाखाली पोलीस खाजगी कामासाठी जात असल्याचे आढळून आले आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी खरंच पोलीस अधिकारी होते का हे देखील कळत नाही. पोलीस जी मौखिक माहिती सांगतील किंवा डायरीत ज्या नोंदी करतील त्यावरच वरिष्ठांना विश्वास ठेवावा लागतो. यावर तोडगा म्हणून पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी "थर्ड आय" नावाचे अॅप विकसित केले आहे. जीपीआरएस प्रणालीवर असलेले हे अॅप प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलमध्ये टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे ड्युटीवर असलेला पोलीस नेमका कुठे आहे हे अधीक्षकांना कळते. पोलिसांनी गस्तीवर जाण्यापूर्वी गाडीचा क्रमांक या अॅपमध्ये टाकायचा. ही गस्तीची (पेट्रोलिंग) गाडी कुठे कुठे जाते, त्याचा ठावठिकाणा (लोकेशन) अधीक्षकांना कळतो. रात्रीच्या वेळी अनेक पोलीस अधिकारी पेट्रोलिंगला गेल्याची थाप मारतात. या अॅपमुळे गस्तीचा मार्ग, किती किलोमीटर गस्त घातली त्याची नोंद होणार आहे. हा सर्व डेटा कायमस्वरूपी साठवला (सेव्ह) जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना कुठल्याही सबबी किंवा थापा मारता येणार नाहीत. पोलीस कुठे आहेत हे त्यांना फोन करून विचारावं लागायचं. त्यामुळे पोलीस सोयीनुसार नॉट रिचेबल झाले की काहीच माहिती मिळत नसे या अॅपद्वारे आतापर्यंत पोलीस कुठे कुठे गेले होते त्याची इंत्यंभूत माहिती सेव्ह होणार आहे आणि कधीही ती पडताळणी जाणार आहे.