गिधाडांवर नजर ठेवणार ‘तिसरा डोळा’; जीपीएस टॅग लावलेली दहा गिधाडे घेणार भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:45 AM2024-07-04T08:45:16+5:302024-07-04T08:45:32+5:30
हरयाणातील पिंजोर येथून २० गिधाडे पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत आणण्यात आली. त्यांना भक्ष्य पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
मुंबई - पेंच व्याघ्र प्रकल्पात बंदीवासात वाढविण्यात आलेली दहा गिधाडे निसर्गात मुक्त विहार करण्यासाठी सज्ज झाली असून, त्यांच्यावर जीपीएस टॅगरूपी ‘तिसरा डोळा’ नजर ठेवणार आहे. जीपीएस टॅगमुळे गिधाडांच्या संचाराचा मागोवा घेतला जाणार असून, त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार असल्याचा दावा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांनी केला आहे.
गिधाडांच्या संवर्धनासाठी बीएनएचएसने राज्य शासनाशी करार केला असून, त्याअंतर्गत पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत गिधाडांना बंदिस्त करण्यात आले. या बंदी गिधाडांना निसर्गमुक्त करण्यासाठी देशभरातील जंगलानजीकची काही सुरक्षित ठिकाणे निवडण्यात आली. त्यात महाराष्ट्रासह राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम येथील काही व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. त्यानुसार जानेवारीत हरयाणातील पिंजोर येथून २० गिधाडे पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत आणण्यात आली. त्यांना भक्ष्य पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
आता त्यातील दहा गिधाडांवर जीपीएस टॅग लावून त्यांना निसर्गमुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बीएनएचएसच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन, हरियाणा सरकार, भारत सरकारच्या पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, तसेच केंद्रीय प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून गिधाडांना निसर्गमुक्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
कोणी केले काम ?
बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे व क्षेत्र संचालक प्रभूनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. काझवीन उमरीगर, डॉ. कृष्णा, हेमंत बाजपेयी, सचिन रानडे, माननसिंग महादेव, भानूप्रताप सिंह, जेफ फ्रान्सिस, जोनाथन डिकोस्टा, मोहम्मद कासीम, लखन बसुदेव, लोकेश गुर्जर, रवी शर्मा, वन्यजीव चिकित्सक डॉ. निखिल बनगर वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर यांनी हे काम केले.
पश्चिम बंगालमध्ये ३१, तर हरयाणात आठ गिधाडांना अशा प्रकारे निसर्गमुक्त करण्यात आले. त्यांच्यावर उपग्रहाच्या माध्यमातून देखरेख
ठेवण्यात आली. जीपीएस टॅग लावलेली गिधाडे नजीकच्या देशात गेल्यास त्यांना इजा होऊ नये यासाठी भूतान, नेपाळ आणि बांगलादेश
येथील पक्षीतज्ज्ञांशी समन्वय साधण्यात आला. नेपाळ आणि भूतानमध्ये चार गिधाडे पोहोचली. त्यातील एकाचा विजेच्या धक्क्याने
मृत्यू झाला. निसर्गमुक्त केलेल्या एकाही गिधाडाला विषयुक्त अन्न मिळाले नाही.