लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत २३ सप्टेंबर रोजी तुफान पाऊस पडला आणि कधी नव्हे ते मध्य मुंबईतल्या परळ येथील दामोदर नाट्यगृहात पावसाचे पाणी घुसले. यात दामोदर नाट्यगृहाचे बरेच नुकसान झाले. मात्र नाट्यगृहाचे संचालक मंडळ आणि आजी-माजी व्यवस्थापक मंडळ कंबर कसून कामाला लागले. त्यांच्या योगदानातून दामोदर नाट्यगृहाचे रूप पूर्ववत करण्यात आले. हे नाट्यगृह २५ डिसेंबरपासून खुले होत असून, या नाट्यगृहात आता ‘तिसरी घंटा’ वाजणार आहे.
मराठी रंगभूमी दिनापासून (५ नोव्हेंबर) नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली; तेव्हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी दामोदर नाट्यगृह सज्ज होते. मात्र नाट्यनिर्माते या नाट्यगृहाकडे न फिरकल्याने अद्याप या ठिकाणी एकही नाटक सादर होऊ शकले नाही. मुंबईत नाटक ‘अनलॉक’ होत असताना, रविवारी (२० डिसेंबर) बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पहिला नाट्यप्रयोग पार पडला. त्याच वेळी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाट्यगृहांत नाटक कधी सादर होणार, अशी चर्चा रंगली होती.
या पार्श्वभूमीवर, दामोदर नाट्यगृहाचे पुन्हा एकदा रसिकांच्या सेवेत रुजू होणे, ही आनंददायक घटना मानली जात आहे. दामोदर नाट्यगृहात नाटक व्हायला हवे, अशा ठाम विश्वासाने नाट्य बुकिंग क्लार्क व व्यवस्थापक सचिव हरी पाटणकर यांनी सोशल सर्व्हिस लीगच्या (दामोदर नाट्यगृह) पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे नाट्यगृह सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आता तब्बल नऊ महिन्यांनंतर दामोदर नाट्यगृह नाट्यप्रयोगांसाठी सज्ज झाले आहे.