तिसऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हालच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2016 05:34 AM2016-10-10T05:34:22+5:302016-10-10T05:34:22+5:30
दिवा रेल्वे स्थानकात जलद गाड्या थांबवण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा भाग म्हणून सलग तिसऱ्या रविवारी नऊ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे धीम्या
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात जलद गाड्या थांबवण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा भाग म्हणून सलग तिसऱ्या रविवारी नऊ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे धीम्या मार्गावर लोकल २० ते २५ मिनिटे उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. जलद मार्ग बंद ठेवल्याने मेल-एक्स्प्रेसही धीम्या मार्गावरून धावत होत्या. त्याचा फटका लोकल वाहतुकीला बसला. दरम्यान, आजच्या कामात पूर्वीचा मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांचा धीमा मार्ग बदलून तो कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्यांचा मार्ग म्हणून वळवण्यात आला. दरम्यान, मराठा मोर्चामुळे पुढील रविवारचा
मेगाब्लॉक रेल्वेने रद्द केल्याने त्या काळातील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गाचे काम नेमके कधी केले जाईल, ते रेल्वेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
मध्य रेल्वे प्रशासनाने अभियांत्रिकी कामासाठी मागील दोन आठवड्यांप्रमाणे रविवारी सकाळी ९.१५ ते सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान मेगाब्लॉक घेतला. या काळात अप-डाउनवरील जलद मार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश जलद लोकल रद्द करण्यात आल्या. काही गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या. परिणामी, ठाणे-कल्याणदरम्यानच्या सर्व स्थानकांत प्रवाशांची गर्दी होती.
लोकल रद्द होण्याचे प्रमाण आणि उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये मोठी गर्दी होती.
नवरात्रोत्सवातील आठवी माळ आणि त्यातच रविवार असल्याने बहुतांश ठिकाणी होमहवनांचे आयोजन करण्यात आल्याने महिलावर्ग बाहेर पडल्याने त्यांनाही फटका बसला. शिवाय, दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या कुटुंबांनाही मेगाब्लॉकचा त्रास झाला. संध्याकाळी ६.३० नंतर जलद मार्गावरील वाहतूक सुरू झाली. (प्रतिनिधी)