Join us

प्रताप सरनाईक यांना ईडीची तिसऱ्यांदा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:05 AM

१० डिसेंबरला हजर राहण्याची सूचना : टॉप्स सिक्युरिटी कंपनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली ...

१० डिसेंबरला हजर राहण्याची सूचना : टॉप्स सिक्युरिटी कंपनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप्स सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले.

येत्या गुरुवारी, १० डिसेंबर राेजी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची सूचना केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी शनिवारी दिली. त्यांनी यावेळी हजर राहणे अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले.

टॉप्स सिक्युरिटीज ग्रुप आणि सरनाईक यांच्यात संशयास्पद व्यवहारांचे काही पुरावे ईडीला सापडले होते. त्यानुसार २४ नोव्हेंबरला त्यांचे ठाणे, मुंबईतील घर व कार्यालयावर छापे टाकले. विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर रहाण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी पत्नी रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून जाण्याचे टाळले. त्यानंतर चार ते पाच वेळा समन्स बजावूनही ते चाैकशीस गैरहजर राहिले. तर, प्रताप सरनाईक यांनी क्वारंटाइन असल्याचे सांगत ईडीने दोन वेळा बजाविलेल्या नाेटीसकडे दुर्लक्ष केले. चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी १४ दिवसांचा अवधी मागितला. मात्र ईडीने तो फेटाळून लावत १० डिसेंबरला हजर राहण्याची सूचना केली.

दरम्यान, सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि टॉप्स सिक्युरिटीज समूहाचे प्रवर्तक अमित चांडाेळे यांना यापूर्वीच याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.