निवडणुकीत प्रथमच तृतीयपंथीय उमेदवार
By admin | Published: February 7, 2017 04:29 AM2017-02-07T04:29:56+5:302017-02-07T04:29:56+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रथमच इतर मतदार म्हणून तृतीयपंथीयांना निवडणूक आयोगाने स्वत:ची ओळख जपण्याचा अधिकार दिला
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रथमच इतर मतदार म्हणून तृतीयपंथीयांना निवडणूक आयोगाने स्वत:ची ओळख जपण्याचा अधिकार दिला. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेत आयोगाने इतर उमेदवार म्हणून तृतीयपंथीयांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचाच फायदा घेत मनपा निवडणुकीत नागरिक अधिकार मंच अर्थात ‘नाम’मधून प्रिया पाटील या पहिल्या तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्याचे पदवी प्रशिक्षण घेतलेल्या प्रिया पाटील या गेल्या आठ वर्षांपासून ‘किन्नर माँ’ या सामाजिक संस्थेमध्ये कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. शिवाय ‘नाम’च्या सदस्या असल्याने मुंबईतील पाणी, रस्ते, शौचालय, शिक्षण या मूलभूत प्रश्नांसह कायदा व सुव्यवस्थेचा चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रस्थापित पक्षांना बगल देत ‘नाम’तर्फे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत पाटील यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे.
पाटील म्हणाल्या की, वास्तव्यास १६३ क्रमांकाच्या प्रभागात राहत असल्याने तिथूनच निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र संबंधित प्रभाग ओबीसीसाठी राखीव होता. ओबीसीचे जात प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात गेले असता, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. मुळात २०१४ सालीच सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना ओबीसीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने यंदा १६६ प्रभागात खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढत आहे. (प्रतिनिधी)