प्रियकराने दगा दिल्याने तृतीयपंथीयाची आत्महत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:37+5:302021-02-05T04:36:37+5:30
मालाडमधील प्रकार : दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कथित प्रियकराने दगा दिल्याने एका तृतीयपंथीयाने गळफास ...
मालाडमधील प्रकार : दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कथित प्रियकराने दगा दिल्याने एका तृतीयपंथीयाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी रविवारी निशाद अहमद (३०) या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पायल अन्सारी ऊर्फ पायल दुबे (४०) ही मालाड पूर्वच्या संतोषनगर येथे राहायची. तिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी याबाबत पोलिसांना समजले आणि तिचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी गोरेगाव रेल्वेस्थानकावर नालासोपारा येथे राहणारा आणि व्यवसायाने प्लंबर असलेल्या अहमदशी पायलची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अहमद हा सतत तिच्याकडे पैशांची मागणी करायचा. तसेच तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले होते. त्यानुसार, पोलिसांनी अहमदवर गुन्हा दाखल केला. पसार अहमदचा शोध घेण्यासाठी दिंडोशी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली असून तो गुजरातला पळाल्याची प्राथमिक माहिती हाती लागली असून त्याअनुषंगाने तपास सुरू आहे.