लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात लसीकरणाची प्रक्रिया वेग घेत आहे. मात्र, अजूनही समाजातील काही घटक लसीकरण प्रक्रियेपासून वंचित आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून अनेक घटकांना विविध अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी एक म्हणजेच मुंबईतील तृतीयपंथीयांना लसीकरणासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. या समस्यांमुळे तृतीयपंथीय लसीकरणापासून वंचित आहेत.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी त्यानंतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणि आता लहानगे सोडले तर सर्व वयोगटातील लाभार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. परंतु, असे असूनही मुंबईतील तृतीयपंथीयांना लस मिळालेली नाही, याविषयी दाद मागितली असता, लसीकऱण केंद्रांवरुन लसीचा तुटवडा आहे, लस संपली आहे अशी अनेक कारणे देण्यात येत आहेत.
याविषयी महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी संरक्षण व कल्याण मंडळाच्या सदस्य आणि किन्नर माँ संस्थेच्या संचालिका सलमा यांनी सांगितले, आजपर्यंत समुदायातील दोन टक्के लाभार्थ्यांचेही लसीकरण झालेले नाही. समुदायातील तृतीयपंथीयांमध्ये माहिती तंत्रज्ञानातील साक्षरतेचा अभाव आहे, शिवाय बऱ्याच लाभार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. यामुळे त्यांना लसीकरणापासून दूर ठेवले जाते. तसेच लसीकऱणातील मोठा अडथळा म्हणजे तृतीय लिंगाविषयीच्या लसीकरणाचे धोरण यंत्रणांकडून स्पष्ट नसल्याने लसीकरण केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना याविषयी कल्पना नाही. त्यामुळे बऱ्याचदा केवळी तृतीय लिंगी म्हणून लाभार्थ्यांना लस घेण्यापासून रोखण्यात आले असून, लस मिळालेली नाही.
विशेष धोरण नाही, सर्वसामान्यांप्रमाणेच लसीकऱणासाठी हिरवा कंदील
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग
समाजातील अन्य घटकांप्रमाणे तृतीय लिंगी असणाऱ्यांना लसीकरणाची परवानगी आहे, त्यासाठी विशेष धोरण नाही. त्यामुळे समाजातील अन्य घटकांप्रमाणेच या घटकालाही लसीकरणाची संमती आहे. मात्र, आधारकार्ड नसतानाही लसीकरण प्रक्रिया राबविण्यासाठी केंद्राकडून कोणतीही मार्गदर्शक तत्वे नसल्याने याविषयी अंतिम निर्णय घेतला नाही. परंतु, सध्या सुरु असलेल्या प्रक्रियेत या घटकालाही समाविष्ट करुन घेतलेले आहे.
लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे
- छाया, तृतीयपंथी
सध्या लसीकऱण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी निवासी वसाहती, गृह संकुलांत लसीकरण मोहिमांचे आयोजन कऱण्यात येत आहे. याच धर्तीवर तृतीय पंथीयांसाठी विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. जेणेकरुन समुदायातील लाभार्थ्यांचे लसीकरण करणे सोपे जाईल. वैयक्तिक पातळीवर लसीकरणासाठी नोंदणी करताना लाभार्थ्यांना अनेक अडचणी येतात, शिवाय लसीकरणाबाबत समुदायात जनजागृतीचाही अभाव दिसून येतो.
आम्हीही लाभार्थी
- रेश्मा खान, तृतीयपंथी
कोरोना, लाॅकडाऊन याचा सर्वाधिक फटका आमच्या समुदायाला बसला. राज्यासह मुंबईच्या आरोग्य यंत्रणेत आमच्यासाठी विशेष कक्ष नाही वा खाट नाही. त्यामुळे समुदायातील अनेकांचे जीवही गेले. आता प्रत्येक दिवशी पोट भरण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो, त्यात सुरक्षितता यावी म्हणून लसीकरण करता यावे, या विचाराने गेले असता, चारहून अधिकवेळा माघारी यावे लागले. लस संपलीय, तुम्हाला देऊ शकत नाही, अशी विविध कारण देत लसीकरण केंद्रावरुन निराश होऊन यावे लागले. समाजाचा आम्ही घटक आहोत, आम्हालाही लसीकरणाचा अधिकार आहे, त्यामुळे लस मिळायला हवी.