रक्षाबंधन कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग
By मनोहर कुंभेजकर | Published: August 30, 2023 08:20 PM2023-08-30T20:20:50+5:302023-08-30T20:20:50+5:30
भारतीय परंपरेत संस्कार आणि संस्कृती संवर्धनासाठी विविध सण साजरे केले जातात.
मुंबई : भारतीय परंपरेत संस्कार आणि संस्कृती संवर्धनासाठी विविध सण साजरे केले जातात. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होऊनही लिंगभेद कायम आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता या तिन्ही गोष्टी या समाजात आपण निर्माण करणे अपेक्षित आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून जनजागृतीच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाजाच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या संकल्पनेतून बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळेत तृतीयपंथी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या करीता तिरंगी रक्षाबंधन व स्वसंरक्षण या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे बंध रेशमाचे! नाते मानवतेचे या उपक्रमात तृतीय पंथीयांना सहभागी करून दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अखिल भारतीय गोजू रिव्ह कराटे फेडरेशनचे अध्यक्ष धीरज पवार, महाराष्ट्र पोलिस माजी प्रशिक्षक भिमराव पवार, आशियायी कराटे पंच ऋतुजा भगत, सहाय्यक प्रशिक्षक माजी पोलिस शाम कदम यांनी प्रशिक्षण दिले. मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे यांच्या मार्गदर्शनाने अधिवेशन प्रमुख राजेंद्र निळे आणि शिक्षकांनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. या प्रसंगी संस्थेचे चिटणीस यशवंत साटम, सदस्य इंद्रायणी सावंत, माधवी घाग, सामाजिक कार्यकर्त्यां वर्षा जाधव उपस्थित होत्या. हया, माही, कुमकुम यांच्या मनोगताने उपस्थितांची हदय हेलावली.एकात्मतेच्या संदेशाने कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.