मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविशिल्ड लसीचा तिसऱ्या टप्प्यातील साठा उपलब्ध झाला आहे. याखेरीज, आता पालिका प्रशासन येत्या काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ करणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून १५ फेब्रुवारीपासून राज्यासह मुंबईत लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.सध्या मुंबई शहर उपनगराकरिता २ लाख ६० हजार डोसचा साठा उपलब्ध झाला आहे. या डोसेजच्या माध्यमातून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे. या लसींचा साठा गरजेनुसार लसीकरण केंद्रांवर पोहोचविला जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरात सध्या २३ लसीकरण केंद्र असून लवकरच या प्रक्रियेत खासगी वैद्यकीय संस्थांनाही समाविष्ट कऱण्यात येणार आहे. आतापर्यंत मुंबईत १ लाख ७ हजार ७२५ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, आता लसीचे डोस उपलब्ध झाल्याने अधिकाधिक लाभार्थ्यांना लसीकरणासाठी जागरुक करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेला आणखी वेग येईल परिणामी कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पुढचे पाऊल असेल असा पालिका प्रशासनाचा मानस आहे.
राज्यात ३३ हजार २६९ रुग्ण उपचाराधीनमुंबई : राज्यात शनिवारी १,७७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १९,७४,२४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८३% एवढे झाले आहे. राज्यात दिवसभरात ३,६११ नवीन रुग्णांचे निदान आणि ३८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २०,६०,१८६ झाली असून, बळींचा आकडा ५१ हजार ४८९ झाला आहे.