मुंबई : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत शून्य फेरी, ३ नियमित फेऱ्या आणि २ विशेष फेऱ्यांचे आयोजन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. अद्यापही बहुतांश महाविद्यालयाचे कट ऑफ चढे राहिल्याने, पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, यंदा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नसल्याने विद्यार्थ्यांसाठी आणखी एका विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले. ही फेरी अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी असणार असल्याचेही त्यांनी
वेळापत्रकात नमूद केले असून विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना सोमवार, १९ सप्टेंबरपासून अर्ज संपादित करता येणार असून गुणवत्ता यादी २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तिसऱ्या विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांना १९ ते २० सप्टेंबरदरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून तिसऱ्या फेरीची निवड यादी २३ सप्टेंबरला जाहीर होईल. २३ आणि २४ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे आदी प्रक्रिया होणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत रिक्त जागांचा फेरीअखेर तपशील जाहीर करण्यात येईल.