Join us

ईडीचे अनिल देशमुखांना तिसरे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:05 AM

हप्ता वसुली चौकशी प्रकरण : उद्या कार्यालयात हजर राहण्याची सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भ्रष्टाचाराबाबत दाखल ...

हप्ता वसुली चौकशी प्रकरण : उद्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भ्रष्टाचाराबाबत दाखल गुन्ह्यात दोनदा चौकशीला हजर राहण्याचे टाळणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी तिसरे समन्स जारी केले आहे. येत्या सोमवारी (दि.५) सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे.

देशमुख यांनी यापूर्वी दोन नोटिसांना स्वतः कार्यालयात हजर न राहता वकिलांद्वारे उत्तर दिले होते. त्यामुळे यावेळी ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत हप्ता वसुली आणि बदल्यांमध्ये गैरव्यवहाराबद्दल दाखल गुन्ह्यात ईडीने देशमुख यांना पहिल्यांदा २६ जूनला चौकशीला हजर राहण्यासाठी बोलाविले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्या विषयसंबंधी चौकशी केली जाणार आहे, याबाबत वकिलामार्फत अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करीत जाणे टाळले होते. तर २९ जुलैला हजर ाराहण्याच्या नोटिसीच्या वेळी हजर न राहता त्यांनी आपले वय, आजारपण व कोरोनाच्या कारणास्तव कार्यालयात हजर राहण्यास नकार दिला, त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीची तयारी दर्शविली होती. तसेच चौकशीसंबंधी प्रश्न, दाखल केलेल्या ईसीआयआरची प्रत कागदपत्रांची मागणी करत आठ दिवसांचा अवधी मागितला होता. ईडीने मात्र त्याला नकार देत आता ५ जुलैला चौकशीला हजर राहण्याबाबत तिसरे समन्स बजावले आहे.

देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे व सहायक कुंदन शिंदे हे २५ जुलैपासून ईडीच्या कोठडीत आहेत. त्याच्याकडील चौकशीतून अनेक गंभीर माहिती अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

देशमुख दिल्लीला रवाना

ईडीने तिसरे समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले. तेथे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कायदेशीर बाबींबाबत सल्ला घेणार आहेत. चौकशीच्या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऋषिकेश देशमुखचीही चौकशी होणार

ईडीच्या चौकशीत अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख सांभाळत असलेल्या विविध कंपन्या आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहार समोर आले आहेत. त्याबाबत त्यांचीही ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांना समन्स बजाविण्यात आले आहे. देशमुख यांच्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.