मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची २९ जून रोजी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार होती. त्यासाठी सकाळी ११ वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देखील बजाविण्यात आले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली.
वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत मंगळवारी अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली. अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर नसले तरी त्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.
अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ईडीकडे ८ दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र याबाबत ईडीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. अनिल देशमुख यांना लवकरच तिसरे समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्याशी संबंधित नातेवाइकांच्या नावे असलेली जंगम व स्थावर मालमत्ता, गेल्या पाच वर्षांचा आयकर परताव्याचा तपशील, नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा सविस्तर तपशील, पाच वर्षांत जमा झालेली देणगी व एकूण निधी, खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे, यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा तपशील, त्याचप्रमाणे दोघांशी झालेल्या संभाषणाबाबतचे तपशील, त्याच्या नोंदीची सविस्तर माहिती मागण्यात आली आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने देशमुख यांच्याकडे चौकशी केली जाईल, असं त्यांचे वकील ॲड. इंद्रपाल सिंग यांनी सांगितले.
हप्तावसुलीबाबतही करणार विचारणा-
ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले होते. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास बोलाविले होते. मात्र, त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चौकशीला जाण्याचे टाळले. ईडीने त्याचदिवशी पुन्हा नव्याने समन्स बजाविताना मुंबईतून झालेल्या हप्तावसुलीबाबत चौकशी करायची असल्याचे नमूद करीत २९ जूनला ११ वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.