Join us

तहानलेल्या कर्नाटकला पंढरीचा विठ्ठल पावला, महाराष्ट्राने सोडले १,५०० क्युसेक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 2:04 PM

पाणी पिण्यासाठीच; शेतीसाठी नाही!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवरून महाराष्ट्र सरकारने शनिवारी कर्नाटकला १,५०० क्युसेक पाणी सोडले आहे. कृष्णा नदीत हे पाणी सोडण्यात आले. मागील आठवड्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबाबत पत्र लिहिले होते. कर्नाटकमधील कृष्णा खोऱ्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या असून वारणा-कोयना पाणीसाठ्यातून २ टीएमसी तर उजनी पाणीसाठ्यातून भीमा नदीत ३ टीएमसी पाणीसाठा सोडण्याची विनंती त्यांनी पत्रात केली होती.

पावसाळा लांबल्याने बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलाशयातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली येत असून ते लोकांसाठी चिंतेचे कारण आहे. नद्या, तलाव आणि विहिरींची पाण्याची पातळी सतत खालावत आहे असून ती मृत साठवण पातळीपर्यंत पोहोचत आहे. लाखो लोक व पशुधन यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन सिद्धरामय्या यांनी ३१ मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून कोयना आणि उजनी जलाशयातील पाणी कृष्णा आणि भीमा नद्यांमध्ये सोडण्याची मागणी केली होती.

पाणी पिण्यासाठीच; शेतीसाठी नाही!

  • याआधीही कर्नाटक सरकारच्या विनंतीनंतर महाराष्ट्र सरकारने वारणा-कोयना पाणीसाठ्यातून कर्नाटकसाठी १ टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले होते.
  • आता महाराष्ट्राने शनिवारी संध्याकाळी राजापूर बॅरेजमधून कृष्णा नदीत १,५०० क्युसेक्स पाणी सोडले आहे. कर्नाटकातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन हे पाणी सोडले असून ते शेतीसाठी सोडण्यात आलेले नाही.
टॅग्स :कर्नाटकमहाराष्ट्र