रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये असणाऱ्या सुरक्षा व स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना घडूनही राजावाडी रुग्णालय परिसरात अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा एकदा अशी घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल रुग्णांकडून उपस्थित केला जात आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या आतील परिसराचा रविवारी ‘लोकमत’ने आढावा घेतला, त्यावेळेस तेथे स्वच्छतेचा अभाव दिसून आला.
रुग्णालयात अनेक ठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने लाकडी फळ्या, लोखंडी शिगा तसेच इतर सामान ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले आहे. यामुळे रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयात प्रवेशद्वाराजवळच रस्त्याला खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना हाेतो. रुग्णालयाचा आढावा घेत असताना अतिदक्षता विभागात वापरलेले हॅण्डग्लोज अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. सीटी स्कॅन, क्षयरोग व कोविड कॅज्युअल्टी विभागाच्या येथे वापरलेले सॅनिटरी पॅड उघड्यावर पडले होते. तसेच रस्त्यात काही औषधांच्या बाटल्या व रुग्णांनी वापरलेल्या पट्ट्याही पडलेल्या आढळून आल्या.
कोरोनाच्या काळात अशा गोष्टींची विल्हेवाट लागणे गरजेचे आहे. मात्र, या वस्तू उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. रुग्णालयात अनेक ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या मशीन या अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहेत. काही मशीन या कायमस्वरूपी बंद पडल्या आहेत.
यामुळे चांगल्या उपचारांसोबतच रुग्णालयात स्वच्छता असणेही गरजेचे आहे. म्हणूनच या गोष्टींकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
......................................................