सायंकाळच्या वेळेस खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य शासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरीही, मुंबईतील काही वर्दळीच्या ठिकाणांवर नेहमीप्रमाणे नागरिक गर्दी करत आहेत. वडाळ्याच्या बरकतअलीनगर येथेही सायंकाळच्या वेळेस खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून अनेक नागरिक विनामास्क खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
बरकतअलीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. येथे सायंकाळच्या वेळेस नागरिक मोठ्या प्रमाणात भाज्या, मासे व फळे खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे या गर्दीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतून ईस्टर्न फ्रीवेवर जाण्यासाठी अनेक वाहनचालक या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे वाहनांचीही येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येथे संचारबंदीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
................................