मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपल्या तोंडावरील मास्क खाली काढून बायोमेट्रिक पंचिंग करावी लागते आहे. मोठी रांग लागत असून, खूप गर्दीत हे सर्व पंचिंग करताना एखाद-दुसरा कोरोनाबाधित नकळत तिथे वावरला तर त्याची इतरही कामगारांना लागण होऊ शकते, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे.
एका कर्मचाऱ्याने सांगितले की, रेल्वेच्या मुख्यालय, डीआरएम कार्यालय व इतर अनेक ठिकाणी कुठेच बायोमेट्रिक पंचिंग सुरू झालेली नाही. असे असताना केवळ लोअर परळ कारखान्यातच हे का सुरू केले जात आहे. हवामान खात्याने अतिवृष्टी जाहीर केलेली आहे. पावसामुळे टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. रेल्वे, बसेस थांबतात. चाकरमाने कुठे मधेच रस्त्यावर, रेल्वेमध्ये, बसमध्ये अडकून पडतात. असे असताना आमच्या रेल प्रशासनाना ह्या आपत्तीतसुद्धा बायोमेट्रिक पंचिंग हवी आहे. काळ, वेळ, प्रसंग काहीतरी बघा. फक्त कामगारांना मानसिक त्रास होतोय याकडे कुणीतरी लक्ष द्यावे. महामारीच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यावर नक्की बायोमेट्रिकचा विचार करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.