पेणची ४२ गावे तहानलेली
By admin | Published: March 20, 2015 10:43 PM2015-03-20T22:43:44+5:302015-03-20T22:43:44+5:30
मार्च महिन्यातच रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात मुबलक पाणी आहे, मात्र नियोजनाअभावी ४२ गावांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे.
आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
मार्च महिन्यातच रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात मुबलक पाणी आहे, मात्र नियोजनाअभावी ४२ गावांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात गावे आणि वाड्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होतो. यावर तोडगा काढण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी १६ ग्रामपंचायतींनी एकत्र येणे गरजेचे असल्याचा निर्णय झाला.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी उभा करावा, असा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला. येथील शहापाडा धरणात पुरेसा पाण्याचा साठा नाही. मात्र या धरणातील पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात जाणे गरजेचे आहे. हेटवणे धरणाच्या पाण्यावर पेण तालुक्यातील नागरिकांचाच हक्क असल्याचे आमदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी सांगितले.
१६ ग्रामपंचायतींवर विविध राजकीय पक्षांची सत्ता आहे, परंतु राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न त्वरित सुटणार नसला तरी या योजनेने सातत्याने निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता येईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी उपस्थित सर्व सरपंचांनी त्याला दुजोरा दिला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अॅड. नीलिमा पाटील, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१६ ग्रामपंचायती एकत्र!
४१६ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन ४२ गावांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसांत ग्रामसभा घ्यावी. त्यानंतर शिखर समिती स्थापन करून ४२ गावांसाठी एकत्रित पाणी योजना आखणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार असून ते सरकारकडून घेता येतील, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मांडले.