बांधकाम व्यवसायाला दुष्काळात तेरावा महिना; आर्थिक मंदीपाठोपाठ कोरोनाचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 03:11 AM2020-03-14T03:11:55+5:302020-03-14T06:38:36+5:30
व्यावसायिक जागांचे खरेदी-विक्री करारही लांबणीवर
मुंबई : पाडव्याचा मुहूर्त साधत मंदावलेल्या गृहखरेदीलाथोडीफार चालना देण्याच्या प्रयत्नात असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना कोरोनामुळे धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेले संभाव्य आर्थिक संकट, प्रवासावर आलेले निर्बंध, लोकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण अशा अनेक कारणांमुळे केवळ गृहखरेदीच नाही, तर व्यावसायिक जागांच्या खरेदी-विक्रीचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेषत: मुंबईत होणारे भाडेपट्ट्यांचे करारही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून मोठ्या सवलतींची आशा होती. मात्र, मुद्रांक शुल्कात अवघी एक टक्के सवलत जाहीर झाल्यानंतर बहुतांश जणांचा भ्रमनिरास झाला आहे. परंतु, ही कपात आणि काही आकर्षक सवलती जाहीर करून गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत तेजी आणण्याचे प्रयत्न केले जाणार होते. मात्र, कोरोनाच्या भीतीचे सावट सर्वत्र पसरल्याने अनेकांनी घर खरेदीचा विचार मागे टाकला आहे. मार्केटिंग कंपन्यांतील टेलिकॉलर्स संभाव्य ग्राहकांना फोन करीत आहेत. मात्र, कोरोनाचे कारण देत अनेक जण घर खरेदीत स्वारस्य दाखवित नसून गृहप्रकल्पांना भेट देण्याचे प्रमाणही रोडावल्याची माहिती हाती आली आहे.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून व्यावसायिक मालमत्ता भाडेपट्ट्याने घेण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासाला निर्बंध आल्यामुळे येत्या काही महिन्यांत अपेक्षित असलेले हे व्यवहारही लांबणीवर पडणार आहेत. त्याशिवाय आर्थिक मंदीपाठोपाठ कोरोनाचे दुष्परिणाम जर जागतिक अर्थव्यवस्थेला सोसावे लागले तर या व्यावसायिक मालमत्तांचीसुद्धा कोंडी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
झळ बसेल, पण तात्पुरती
कोरोनामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला थोड्याफार प्रमाणात झळ बसणार आहेच. तशी ती बांधकाम व्यवसायालाही बसेल. परंतु, ती तात्पुरती असेल. गुढीपाडव्यापूर्वी हे संकट दूर होईल, असा सकारात्मक विचार प्रत्येकानेच करायला हवा. - राजन बांदेलकर, अध्यक्ष, नरेडको (पश्चिम विभाग)
विकासकांना इन्व्हेस्टर्सचा घोर
बांधकाम पूर्ण झालेल्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये इन्व्हेस्टर्सचे फ्लॅट उपलब्ध आहेत. ठाण्यातील एक बडा विकासक आपल्या प्रकल्पातील जे घर १ कोटी २० लाखांना विकतोय त्याच इमारतीतील इन्व्हेस्टर ९८ लाखांत घर विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे प्रकार सर्वच ठिकाणी सुरू असून त्यामुळे विकासकांची कोंडी वाढल्याची माहिती रुचीत झुनझुनवाला या मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवसायातील एजंटने दिली.