आईच्या हत्येनंतर साजरा केला थर्टी फर्स्ट, घाटकोपर हत्याकांडाचा झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:32 AM2020-01-10T04:32:31+5:302020-01-10T04:32:36+5:30
वारंवार बजावूनदेखील आईने फ्रिज वाजवणे न थांबविल्याच्या रागात मुलाने आईचा गळा आवळला.
मुंबई : वारंवार बजावूनदेखील आईने फ्रिज वाजवणे न थांबविल्याच्या रागात मुलाने आईचा गळा आवळला. आईची हत्या झाल्याचे समजताच, मृतदेहाची विल्हेवाट लावणे सोपे जावे म्हणून तिचे तीन भागात तुकडे केले. ते धुतल्यानंतर तुकड्यांना चादरीत गुंडाळून दुचाकीवरून विविध भागांत फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर या विकृत मुलाने मित्रांसोबत थर्टी फर्स्टही साजरी केल्याची माहिती घाटकोपर हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सोहेल शेखच्या चौकशीतून समोर येत आहे.
विद्याविहारच्या नेवी गेट परिसरात ३० डिसेंबर रोजी महिलेचे धड सापडल्याने खळबळ उडाली. घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. त्यापाठोपाठ पाय आणि शीरही पोलिसांच्या हाती लागले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांच्या पथकाने तपास सुरू केला. यात, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीप बने, समाधान चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारेसह अंमलदारांचा समावेश होता.
पथकाने विद्याविहार ते विनोबा भावे नगर परिसरातील झोपडपट्टी पिंजून काढण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान पोलीस सोमवारी सोहेलच्याही घरी धडकले. तेथे तो आई बदरुनीसा सफी शेख (४८) हिच्यासोबत राहत असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या आईबाबत चौकशी केली. तेव्हा, आई कामानिमित्त दिल्लीला गेली असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांचा तपास सुरू असतानाच, सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये स्कूटी आणि त्यावरील तरुणाचे अंधुकसे चित्र पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तोच धागा पकडून तपास केला असता, ती स्कूटी अमित शहाच्या मालकीची असल्याचे समोर आले. तो तपास सुरू असतानाच, सीसीटीव्हीतील संशयिताची चेहरेपट्टी आणि सोहेलच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवरून पोलीस पुन्हा सोहेलच्या घरी पोहोचले. मंगळवारी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. सुरुवातीला त्याने वेगवेगळ्या कहाण्या रचण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बदरुनीसा सफी शेख या सोहेलसोबत कुर्ला परिसरात राहायच्या. लहान मुलगा कुवेतला असतो. सोहेल सात वर्षांचा असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. आठवी पास असलेल्या बदरुनीसा यांनी परिसरातच पार्लरचे काम सुरू केले. दहावी पास असलेला सोहेल हा बेरोजगार होता. त्यात नशेचेही व्यसन असल्याने त्याचे पैशांवरून आईसोबत खटके उडायचे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
>मृतदेहासोबत काढली रात्र...
२८ डिसेंबरला सायंकाळी ६ च्या सुमारास सोहेल टीव्ही पाहत असताना, बदरुनीसा या फ्रिज वाजवत गाणे गात होत्या. सोहेलने त्यांना फ्रिज वाजवू नये असे सांगितले. मात्र तरीदेखील त्या फ्रिज वाजवत असल्याने रागात सोहेलने त्यांना बाथरूममध्ये नेत गळा आवळला. यात त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये ठेवून तो बाहेर निघून गेला. तेथून दर्गाहमध्ये जात रात्री उशिराने घरी आला. आईच्या मृतदेहासोबतच रात्र काढल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने घरातील चाकूच्या आधारे बाथरूममध्येच आईच्या शरीराचे तुकडे करण्यास सुरुवात केली. ते धुऊन फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर दुकानातून बॉक्सिंग टेप आणून त्यात तुकडे बांधले. आईची सोन्याची बांगडी विकून गहाण ठेवलेली स्कूटी घेऊन आला. २९ ते ३० डिसेंबरदरम्यान सुरुवातीला आईचे पाय फेकले. त्यानंतर, तिचे धड आणि शीर फेकून पुन्हा घर गाठले. दोन दिवस महिंद्रा पार्कजवळील झोपडपट्टीत राहत असलेल्या मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टीही साजरी केली. या मित्रांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
>हत्येनंतर पोलीस ठाण्यात फेरी : आईच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच, सोहेलने पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. काही न झाल्याचा आव आणत तो मित्रांसोबत पोलीस ठाण्यालगतच्या महिंद्रा पार्क इमारतीखाली बसू लागला. याच दरम्यान त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून मित्रांसोबत त्याने पोलीस ठाण्यातही फेरी मारली. याच इमारतीत त्याची आत्या राहतो.
>दागिने विकून मैत्रिणीवर खर्च
आईच्या हत्येनंतर घरातील सर्व दागिने विकून त्यातील काही रक्कम त्याने मैत्रिणीला दिली. यात मैत्रिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.