लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या काळात नवीन वर्षानिमित्त होणारी गर्दी रोखण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर होती. सर्व नागरिक सहकुटुंब नवीन वर्ष साजरे करीत होते, तर पोलीस अधिकारी व अंमलदार डोळ्यात तेल घालून रस्त्यावर पहारा देत होते. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या वेळी राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाेलिसांचे कौतुक केले.
कोणताही सणवार असो, महाराष्ट्र पोलीस नेहमीच सतर्क राहून जनतेला हे सणवार पारंपरिकपणे ते साजरे करता यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. त्याचप्रमाणे नवीन वर्षही नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबत सुरक्षितपणे साजरे करता यावे, यासाठी पोलीस सज्ज होते. मग ते मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर असो किंवा शेवटच्या टोकाच्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस असो. सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बंदोबस्त केला.
* मनाेधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील
कोविड-१९ महामारीच्या काळात राज्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांसाेबत शिस्तबद्धरीत्या काम करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबत हेही काम त्यांना करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत राहीन, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.
...............................