थर्टी फर्स्टचा उत्साह १३ हजार मुंबईकरांना पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:41+5:302021-01-03T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सार्वजनिक ठिकाणी ३१ डिसेंबर राेजी विनामास्क फिरणाऱ्या १३ हजार १७९ लोकांना वर्षाचा शेवटचा दिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी ३१ डिसेंबर राेजी विनामास्क फिरणाऱ्या १३ हजार १७९ लोकांना वर्षाचा शेवटचा दिवस महागात पडला. नियम मोडणाऱ्या या लोकांकडून महापालिकेच्या पथकाने एका दिवसात तब्बल २६ लाख ३५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. तर एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत एकूण १८ कोटी ८७ लाख ४८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र समज, दंडात्मक कारवाई, पोलिसी खाक्या आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवेश नाकारूनही अनेक ठिकाणी विनामास्क फिरणारे आढळून येत आहेत. त्यामुळे दररोज २० ते २४ हजार लोकांवर कारवाई करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यानुसार थर्टी फर्स्ट डिसेंबर रोजी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी पालिकेचे पथक, क्लीनअप मार्शल मुंबईकरांवर वॉच ठेवून होते. दिवसभरात या कारवाई अंतर्गत १३ हजार १७९ लोकांना दंड करण्यात आला. हा आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक दंड आहे.
* दादर, परळ, शिवडीत सर्वाधिक दंड
गेल्या नऊ महिन्यांत आतापर्यंत दादर, परळ, माटुंगा, शिवडी, वडाळा, माहिम भागात सर्वाधिक एक लाख ६९ हजार ४७० नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले. त्याखालोखाल अंधेरी, गोरेगाव आणि मालाड भागात एक लाख ४२ हजार ५८५. कुलाबा, फोर्ट, चर्चगेट, गिरगाव, ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रल भागात एक लाख ३१ हजार तर खार, सांताक्रुझ, अंधेरी, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, दहिसर, बोरीवली आणि कांदिवली भागात एक लाख २२० हजार मुंबईकर तसेच गोवंडी, मानखुर्द आणि कुर्ला परिसरात एक लाख सहा हजार लोक आढळून आले.