Join us

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी मोजले साडेपाच लाख

By admin | Published: December 31, 2015 1:08 AM

नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्ट्यांसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आतापर्यंत ४३ जणांनी मद्याचा रीतसर परवाना घेतला आहे. त्यापोटी, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाच लाख ६९ हजार ७५०

- जितेंद्र कालेकर,  ठाणेनववर्ष सेलिब्रेशनच्या पार्ट्यांसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आतापर्यंत ४३ जणांनी मद्याचा रीतसर परवाना घेतला आहे. त्यापोटी, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाच लाख ६९ हजार ७५० रुपयांचे शुल्क भरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दमणमार्गे येणारे बेकायदा मद्य पकडण्यासाठी दोन भरारी पथकांसह ३० टेहळणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.घरात अथवा हॉटेलमध्ये समूहाने नववर्ष स्वागताची पार्टी करण्यासाठी विनापरवाना मद्य पार्टी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम उघडली होती. त्यामुळे विनापरवाना अगदी घरातही पार्टी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्हा अधीक्षक एन.एन. पाटील यांनी दिला होता. अर्थात, या इशाऱ्यानंतरही घरात पार्टीचे आयोेजन करणाऱ्यांपैकी कोणीही परवाना घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे शहर, कल्याण आणि डोंबिवली परिसरांतील काही बड्या हॉटेल आणि क्लबचालकांनी अशा पार्टीसाठी परवाना मागितला आहे. एका परवान्यापोटी १३ हजार २५० रुपये जमा झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातून ४० परवान्यांचे पाच लाख ३० हजारांचे शुल्क जमा झाले आहे, तर पालघर जिल्ह्यातून अवघ्या तिघांनी परवाना मागितला असून त्यापोटी ३९ हजार ७५० शुल्क जमा झाले आहे. त्यामुळे विनापरवाना घरगुती, ढाबे आणि अन्य ठिकाणी पार्टी करणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.बनावट दारूविरोधात मोहीमदमणनिर्मित तसेच बनावट विदेशी मद्यविक्री करणारे आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे आणि पालघर विभागांतून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन्ही जिल्ह्याच्या सीमा आणि नाक्यांवर पथके तैनात केली आहेत. ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी १४ विभागांतील १४ निरीक्षकांची २८ पथके आणि दोन भरारी पथके कल्याण, ठाणे आणि पालघर येथील तीन उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. दहीसर, चारोटी नाका, डहाणूसह ठिकठिकाणी त्यांच्याकडून तपासणी केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत या पथकांनी लाखो रुपयांचे हजारो लीटर गावठी आणि बनावट विदेशी मद्य जप्त केले आहे. यात टेम्पोसह १० वाहनेही जप्त करण्यात आली. बुधवारीही डहाणू विभागाने एका ह्युंदाई वेरना कारसह पाच लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.धडाक्यात कारवाई सुरूअंबरनाथमध्ये २९ डिसेंबरला १४ हजारांची गावठी दारू जप्त करण्यात आली. मुंब्रा-पनवेल रोडवर दहीसर मोरी येथे एका मारुती कारमधून गावठी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. तर, भिवंडीतील पद्मानगर नारपोली भागातून एका टेम्पोमधून ४२० लीटर गावठी दारू आणि ४२० लीटर ताडी जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. ही कारवाई आणखी दोन दिवस अशीच सुरू राहणार आहे.