ही लढाई संपलेली नाही, आता खरी सुरुवात - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:40 AM2024-05-21T10:40:37+5:302024-05-21T10:40:45+5:30
आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानावर नेऊन बसवायचे आहे, असे भावनिक पत्र शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील सदस्य व कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे.
मुंबई : गेले जवळपास एक वर्ष आपण सर्वजण एक फार मोठी लढाई लढत आहोत. ही लढाई आपल्या व्यक्तिगत लाभाची लढाई नसून ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता, विचार आणि मूल्यांची आहे. मात्र, ही लढाई संपलेली नाही. आता खरी लढाई सुरू झाली आहे. जे आपल्याला सोडून गेले, ते गेले. आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानावर नेऊन बसवायचे आहे, असे भावनिक पत्र शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील सदस्य व कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे.
अदृश्य शक्तींनी चिन्ह काढले
महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न हा काही आजचा नाही. तो गेले साडेतीनशे वर्षे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची बाजी लावली; पण दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी तर मृत्यू पत्करला. मात्र, ते दिल्लीसमोर झुकले नाहीत. शरद पवार याच महापुरुषांचे वैचारिक वारसदार आहेत, ते दिल्लीसमोर का झुकतील? काही अदृश्य शक्तींनी आपले पक्ष, चिन्ह काढून घेतले आहे, मात्र जे गेले त्याचा शोक करायचा नाही, मोठ्या ताकदीने लढाई लढायची हाच आपला विचार आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.