मुंबई - महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपा नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या सातत्याने सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तर सोमय्यांच्या आरोपाला सत्ताधारी नेतेही जोरदार उत्तर देत आहेत. आता भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र त्याला कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, २०१७ मध्ये बंद झालेल्या कंपनीचे काहीतरी बँक व्यवहार काढून पोलिसांनी माझ्यावर गुन्हा नोंदवला आहे. अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल केल्यानं माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. संजय राऊत, नवाब मलिक आणि एका आयपीएस अधिकाऱ्याला एक्पोज केल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच तुम्हीही कितीही खोटे गुन्हे दाखल करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी माझी लढाई सुरू राहील. मी कुठल्याही कारवाईला घाबरणार नाही. कायदेशीररित्या या प्रकरणाचं उत्तर मी कोर्टात देईन. त्याचसोबत कोर्टात खरे काय आणि खोटे काय हे उघड होईल असा विश्वास मोहित कंबोज यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे.