Hijab Row: मुंबईतील कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी, नियमावलीत उल्लेख; प्राचार्यांनी सांगितलं 'या' मागील खरं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:53 PM2022-02-10T12:53:18+5:302022-02-10T12:55:52+5:30
Hijab Row: कर्नाटकमध्ये महाविद्यालयात बुरखा घालण्यावरून वाद पेटला आहे .त्याचे पडसाद सर्वच देशात उमटत आहेत. त्यातच आता मुंबईतील एका कॉलेजमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे.
- अल्पेश करकरे
मुंबई - कर्नाटकमध्ये महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून वाद पेटला आहे .त्याचे पडसाद सर्वच देशात उमटत आहेत. त्यातच आता मुंबईतील एका कॉलेजमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. मुंबईत कॉलेजमध्ये महिलांच्या बुरखा आणि घुंगटवर बंदी आहे. या कॉलेजचं नाव आहे एसएनडीटी विद्यापीठ संचालित एमएमपी शाह कॉलेज.
मुंबईतील एमएमपी शाह कॉलेजमध्ये बुरख्यावर चक्क बंदी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि कॉलेजवर टीका होत आहे. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठ संचालित एमएमपी शाह कॉलेजने स्कार्फ आणि बुरखा घातलेल्यांना कॉलेजमध्ये प्रवेश बंदी आहे, असे महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत आहे. या नियमांमध्ये दुपट्टा, घुंगट आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, असे कॉलेजने स्पष्ट लिहिले आहे.
मी आता यावर काही बोलू शकत नाही तुम्ही महाविद्यालयात येऊन मला भेटा मी तुम्हाला सविस्तर प्रतिक्रिया देईन आमच्या महाविद्यालयाच्या पत्रिकेत ते आहे की नाही, याबद्दल काहीही प्रतिक्रिया मी देणार नाही, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयातील बुरख्यावरील बंदीची बातमी समोर आल्यानंतर सुरुवातीला एमएमपी शाह कॉलेजच्या प्राचार्य म्हणाल्या. त्यानंतर प्राचार्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाल्या प्राचार्य लीना राजे?
'आमच्या वेबसाईटवर जी नियमावली आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्येही हे लिहिलं आहे. याचं एक महत्त्वाचं कारण आहे. काही काळापूर्वी काही तरूण मुलं हिजाब घालून कॉलेजमध्ये येत होते. पूर्ण बुरखा घालून यायचे आणि मुलींना त्रास द्यायचे. या सगळ्या घटना वाढल्यानंतर आम्हाला हा नियम करावा लागला. आमच्या कॉलेजमध्ये कुठल्याही मुलीला बुरखा घालून येण्यापासून रोखण्यात येत नाही. तुम्ही कॉलेजच्या आवारात थांबून पाहूही शकता. आमच्या महाविद्यालयात जवळपास 50 टक्के विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत. तुम्ही त्यांनाही विचारू शकता की तुम्हाला अडवलं जातं का? '
'आमच्या महाविद्यालयातल्या काही प्राध्यापिकाही मुस्लिम आहेत. आम्ही त्यांनाही बुरखा घालण्यापासून रोखलेलं नाही. मागच्या काळात जे काही प्रसंग घडले तसा अनुभव पुन्हा कुणालाही येऊ नये इतकाच आमचा या मागचा उद्देश आहे. म्हणून आम्ही तो नियम लिहिला आहे. ही घटना कर्नाटकच्या प्रकरणाशी जोडून त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आहे. आम्ही वर्ग सुरू असताना बुरखा काढण्यास सांगतो जेणेकरून मागच्यावेळी झाले ते होऊ नयेत. आमच्या वेबसाईटवर आणि नियमावलीत लिहिलेल्या नियमाचा पूर्णपणे चुकीचा अर्थ काढला गेला आहे', असे प्राचार्य लीना राजे यांनी सांगितले.
याबाबत विधानसभेचे सदस्य /आमदार रईस शेख यांनी याविषयी आपलं म्हणणं मांडले, ते म्हणाले की , महाराष्ट्रात जर अशाप्रकारे कॉलेजमध्ये नियम असतील तर त्याला आमचा विरोध आहे. कॉलेज प्रशासनाने वेळीच काय ते नियम बदलावे आमचं म्हणणं आहे तसेच महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालावे अशी आमची मागणी आहे.अन्यथा आम्ही कॉलेज प्रशासनाला विरोध करू .