मुंबईत रस्ते आणि फूटपाथ दुरुस्तीची कामं तर नेहमी सुरुच असतात. पण रस्ता किंवा फुटपाथ खोदलेला दिसला की तो मुंबई मनपा किंवा एमएमआरडीएनेच खोदला असेल असं समजू नका कारण मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एक फूटपाथ चक्क चोरांनी खोदला आणि एमटीएनलची ६ ते ७ लाख रुपये किमतीची तांब्याची केबल चोरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.
दादर-माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या एका स्थानिकाला हा प्रकार लक्षात आला. फूटपाथ खोदून त्यातून केबल चोरीला गेल्याचं दिसलं. तांब्याच्या केबलची किंमत ८४५ रुपये प्रतिकिलो इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चोरांनी तब्बल ६ ते ७ लाख रुपये किंमतीची केबल चोरली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याचप्रकारच्या घटना माटुंगा, किंग्ज सर्कल, वडाळा आणि शिवाजी पार्क परिसरात घडण्याचा धोका आहे.
किंग्स सर्कल-दादर टीटी सर्कल दरम्यानचा २ ते ३ मीटर रुंदीचा फूटपाथ अधे-मधे खोदल्याचं स्थानिकांना दिसून आलं आणि संशय बळावला. त्यानंतर स्थानिकांनी मनपाशी संपर्क साधला. विशेष म्हणजे, बीएमसीने तोच फूटपाथ कामासाठी १५ दिवस आधी खोदला होता. तो सुरळीत केल्यानंतर त्याच जागी पुन्हा खोदकाम झाले होते. रहिवाशांनी हे बीएमसीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी पालिकेचे अधिकारी पोहोचले. तेव्हा चोरट्यांनी फूटपाथच्या खाली असलेल्या युटिलिटी केबल्समधून तांब्याच्या तारा लंपास केल्या असल्याचं लक्षात आलं.
"जूनचा पहिला आठवडा संपूनही फूटपाथचं काम पूर्ण होत नसल्याचं दिसलं. त्यामुळे मी पालिका कार्यालयात याची तक्रार करण्यासाठी गेलो. तेव्हा मला या केबल्समधून तांब्याच्या तारांची चोरी झाल्याची माहिती मिळाली. फूटपाथ खोदून केबलमधून चोरट्यांनी रात्री ११ वाजल्यानंतर ही चोरी केली होती. हे अतिशय धक्कादायक आहे", असे वडाळा येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते निखिल देसाई यांनी सांगितलं.
सरकारी दूरसंचार कंपनी MTNL ने देखील दादर-माटुंगा परिसरात ४०० हून अधिक टेलिफोन लाईन्स ट्रिप झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. "आमचं अजूनही दुरुस्तीचं काम करत आहोत. हे मुख्यतः दादर टीटी सर्कलच्या आसपास घडले आहे, लाखो रुपये किमतीची १०५ मीटर तांब्याची तार चोरीला गेली आहे", असे एमटीएनएलच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
आरोपींना कसं पकडलं?ज्या ठिकाणी चोरांनी खोदून ठेवलं होतं तिथं अजूनही तांब्याची तार शिल्लक होती. त्यामुळे चोर पुन्हा तिथं येणार याची शक्यता होती. पोलिसांनी सापळा रचला आणि रविवारी रात्री पाच जणांना रंगेहाथ अटक केली. "आम्ही रविवारी रात्री पाळत ठेवून एका खाजगी कारमध्ये चोरांची वाट पाहत होतो. ते ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांसह आल्यावर आम्ही त्यांना अडवून अटक केली. पाचही आरोपी भंगार विक्रेते आहेत आणि त्यांनी तांब्याच्या तारा विकून पैसे कमावण्याची तयारी केली होती", असे माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरोडेखोर दररोज फूटपाथचा एक छोटासा भाग खोदत होते. या गुन्ह्यात आणखी लोक सामील असण्याची शक्यता आहे. “पाच जणांचे इतर साथीदार आहेत, कारण संपूर्ण भाग खोदणे फक्त पाच लोकांना शक्य नव्हते. आम्ही त्यांच्या टोळीतील इतरांचा शोध घेत आहोत", असे माटुंगा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.