राज्यात महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळावे, असे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे म्हणणे होते. मात्र, जागावाटपाच्या तिढ्यात वंचितने आपले उमेदवार जाहीर केले अन् महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडी बाहेर पडल्यावर अधोरेखित झाले. त्यानंतरही, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर, काँग्रेसही अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीला समर्थन देणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेसनेही अकोल्यातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीही जोमाने मैदानात उतरली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्याना आवाहन केलं आहे. आदिवासी आणि ओबीसी समाजाशी आपण संपर्क ठेवला पाहिजे. ओबीसी समाज बांधवांना भेटलं पाहिजे. भाजपा विरुद्ध असलेल्यांना आपण भेटलं पाहिजे. ही निवडणूक भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त मतं आपल्याला कसे पडतील यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलं पाहिजे. आपले मतभेद बाजूला ठेऊन, पक्षाचा आदेश मानला पाहिजे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ ट्विट करत कार्यकर्त्यांना निवडणुकासाठी आवाहन केलं आहे.
आमची भूमिका मान्य झाली नाही - आंबेडकर
विस्थापितांना सोबत घेऊन सत्तेत गेले पाहिजे हा आमचा आग्रह होता. परंतु आमची भूमिका मान्य झाली नाही. निवडणूक जवळ आली, त्यामुळे आमच्या तयारीच्या जोरावर आम्ही निवडणुकीला उभं राहतोय. राज्यातील अनेक मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. इलेक्टोरल बॉन्ड हा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असेल. हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हुकुमशाहाला देशात जन्म दिला जातोय, त्यावर सुप्रीम कोर्टाने नोटबंदीबाबत निरिक्षण नोंदवले, अर्थमंत्र्यांनाही याची जाणीव नव्हती. हा निर्णय बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत ओबीसीचं आरक्षण स्वतंत्र असले पाहिजे आणि ते वाचले पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.