"हा ऐतिहासिक क्षण, मी शिवरायांची शपथ घेतली होती"; मुख्यमंत्री शिंदेंचं उत्साही भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 11:30 AM2024-01-27T11:30:23+5:302024-01-27T11:32:04+5:30
मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे, मला आपल्या सर्वांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव आहे
मुंबई - मराठा समाजाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस देऊन त्यांचं उपोषण सोडण्यात आलं. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे, मराठा समाजाने उधळलेल्या या विजयी गुलालाचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान करावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना मराठा समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच, जरांगे पाटील यांच्या लढ्याचं हे यश सरकारचं यश असल्याचंही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती देण्याची घोषणा केली.
मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे, मला आपल्या सर्वांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच मी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला साक्ष मानून शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करत आहे, दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कष्टकरी, कामगार, गोरगरिबांचं सरकार आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत, सर्वसामान्यांसाठी आम्ही नेहमीच निर्णय घेतले. आज मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, या समाजाने मोठा संघर्ष केला आहे. अनेकांना मराठा समाजामुळे मोठमोठी पदे मिळाली, अनेक नेते मोठे केले. पण, मराठा समाजाला न्याय देण्याची संधी आली तेव्हा ती देण्याचं काम करायला हवं होतं. विजयाचा दिवस, गुलाल उधळण्याचा दिवस. मनोज जरांगेंनी मला इथं बोलावलं, मी आपल्या प्रेमापोटी इथं आलो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.
मनोज जरांगे यांची भेट..
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 27, 2024
🗓️ 27-01-2024📍वाशी https://t.co/ykt1SLNV3H
आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. सरकारची मानसिकता ही देणारी आहे. मराठा आणि ओबीसी गावागावात एकत्र राहतो आम्हाला कुणाच्या हक्काचं घ्यायचं नाही, पण आमच्या हक्काचं सोडायचं नाही, असं जरांगे म्हणाले. म्हणूनच, सर्वच मराठा बांधवांची फौज कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी उभे राहिला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती
कुणबी प्रमाणपत्र सोडून, मराठा समाजाला आरक्षण टिकणारं, इतर समाजावर अन्याय न करणारं आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जातील, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केली.