मुंबई - केंद्र सरकारकडून संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, १८ ते २२ सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. त्यावरुन आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं मोदी सरकारला सवाल विचारले असून हे हिंदुविरोधी काम असल्याचंही म्हटलंय.
केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, आता मोदी सरकारच्या विशेष अधिवेशनावरुन चर्चा होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत विरोधकांच्या २८ पक्षांचे नेते आले आहेत. त्यातच, हे वृत्त झळकल्याने अनेक खासदारांनी व पक्षांनी आक्रमक भूमिका घेत याला विरोध केलाय.
देशात १८ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र, याच कालावधील केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. गणेशोत्सव हा देभरातील हिंदूंसाठी मोठा सण आहे, विशेषत: महाराष्ट्रात या सणांत मोठा उत्साह असतो. मात्र, याच काळात सर्व खासदारांना दिल्लीला बोलावलं जातंय. हे हिंदुविरोधी काम असून हिंदूंच्या भावना दुखावणारं आहे. हे कशासाठी होतंय, कशाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे. तसेच, सरकारचं हे काम हिंदुविरोधी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
केंद्र सरकार आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी. विशेष अधिवेशनासाठी हीच तारीख का ठरवण्यात आली आहे?, असा सवालही प्रियंका चतुर्वेदींनी विचारला आहे. आता, हिवाळी अधिवेशन होत असताना मध्येच हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आले आहे. बिहारमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी, भाजपने मोठा गदारोळ घातला होता. आता, याच भाजप सरकारने हे हिंदुविरोध काम का केलंय, असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे.
राहुल गांधींचाही मोदींवर निशाणा
मला वाटते की, कदाचित मोदींच्या मनात थोडीशी भीती असेल, त्याप्रकारची भीती जेव्हा मी संसेदत भाषण केल्यानंतर त्यांना वाटली होती. त्या भीतीमुळेच, माझी खासदारकी रद्द करण्यात आली. म्हणूनच, मला वाटते की ही भीतीची बाब आहे. कारण, हे सर्व प्रकरण पंतप्रधानांच्या जवळचे आहेत. जेव्हा तुम्ही अदानींचे प्रकरण काढता तेव्हा पंतप्रधान असह्य आणि घाबरतात, असे उत्तर राहुल गांधींनी संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात दिले.