मुंबई - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्वांनाच परिचीत आहेत. अनेकदा त्यांनी आपली भूमिका मांडताना पक्षीय विचार न करत मत मांडले आहे. तर, पक्षावरही अप्रत्यक्षपणे टीका केलीय. आता, बुलढाण्यातील एका कार्यक्रमातही त्यांनी भाजपात होत असलेल्या गर्दीचा आणि भाजपासोबत येणाऱ्या राजकीय नेतेमंडळींसह पक्षाला घरचा अहेर दिलाय. त्यानंतर, शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करत, भाजपला लक्ष्य केलं. तसेच, नाव न घेता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्यावरही बोचरी टीका केली.
भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे. नवीन ग्राहकांची कमी नाही. ओरीजनल ग्राहक मात्र दिसत नाही, असा मार्मिक टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी बुलढाणा येथे लगावला. गडकरींच्या याच भाषणाचा धागा पकडत आज खऱ्या भाजपाच कार्यकर्त्यांची अवस्था ही सतरंज्या उचलण्याचीच झालीय, असे राऊत यांनी म्हटले.
भाजपामध्ये काम करणाऱ्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांची तीच व्यथा आहे. आम्ही फक्त सतरंज्या उचलायलाच आहोत, असे त्यांचे जुने कार्यकर्ते म्हणतात. ज्यांनी भाजपला आयुष्यभर धू धू धुतलं आणि भाजपने ज्यांना भ्रष्टाचारावरुन धुतलं तेच आज भाजपासोबत आहेत. हा सगळा चायना माल आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर आणि भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांवर तोफ डागली. तसेच, नितीन गडकरींचं अभिनंदन केलं पाहिजे, की त्यांनी सत्य परिस्थितीमध्ये बोलण्याची हिंमत दाखवली, असेही राऊत यांनी म्हटले.
काय म्हणाले होते गडकरी
गडकरींनी आजपर्यंतच्या भाजपाच्या वाटचालीचा धावता आढावा घेत जनसंघाच्या काळात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा नव्हती. परंतू तेव्हा विचार, देश आणि समाजकारणाच्या एका विशिष्ट धेय्यावर प्रतिकुलतेत निवडणुकात हार निश्चीत असतांनाही कार्यकर्ते निष्ठेने कार्यरत रहात होते. जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत केलेल्या कामामुळेच आज भाजप यशाच्या तथा सत्तेच्या शिखराव आहे. परंतू त्यामागे एक विचार होता. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे उत्तरदायित्व देण्याची भूमिका होती. त्यातूनच आपल्याला महामंत्री करण्यात आले होते. आज राजकारणाची व्याख्या बदलली आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण झाल्याचे ते म्हणाले. निस्वार्थ कार्यकर्त्यांनी स्वत:ला पक्षाच्या विचारात वाहून घेतल्यानेच आज पक्ष शिखरावर पोहोचला आहे. आमच दुकान चालायला लागल्यावर नवे कार्यकर्ते जोडल्या गेले. मात्र, जुने फारसे दिसत नसल्याचा टोलाही वर्तमान राजकीय परिस्थितीवर त्यांनी लगावला, तेव्हा सभागृहात हास्याचे फवारे उडाले.