'हा' तर राष्ट्रध्वजाचा अवमान, रश्मी ठाकरेंविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 07:47 AM2022-01-27T07:47:20+5:302022-01-27T07:49:14+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या प्रकृती अस्वस्थतेमुळे घरातूनच कामकाज पाहत आहेत. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय.
नवी दिल्ली - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र, आता या ध्वजारोहण समारंभातील फोटोवरुन अॅड. जयश्री पाटील यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या प्रकृती अस्वस्थतेमुळे घरातूनच कामकाज पाहत आहेत. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळे, ते खूप दिवसांनी आज कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थितीत दिसून आले. वर्षा या निवासस्थानी त्यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, अॅड. जयश्री पाटील यांनी या फोटोवरुन, रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची तक्रार आयुक्तांकडे दिली आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने #वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री @AUThackeray, मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती आदी उपस्थित होते.#प्रजासत्ताकदिन#RepublicDaypic.twitter.com/XI9oJSL21H
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 26, 2022
व्हायरल फोटोमध्ये मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री तिरंग्याला सलामी देताना दिसत आहेत, मात्र रश्मी ठाकरे या सलामी देताना दिसून येत नाहीत. त्यावरुन, ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, आदित्य ठाकरेंना शिष्टाचाराचा भंग करुन मुख्यमंत्र्यांसमेवत रेड कार्पेटवर उभे करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
जयश्री पाटील यांच्या तक्रारीत काय म्हटलंय?
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. पण याबद्दल माझा काही आक्षेप नाही, कोणी एम. के. गांधी यांच्या विचारांचे तर कोणी श्रीमान नथुराम गोडसे यांच्या विचाराला मान्यता देऊ शकतात. तो त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजारोहण करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या रेड कार्पेटवर ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत, हे कोणतं शहाणपण? त्यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का? सार्वजनिक जीवनात ध्वजसंहितेचा अपमान करणे हे भारतीय नागरिकांच्या भावनांचा सार्वजनिकरित्या अपमान केल्यासारखं आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा अपमान या संबंधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून अक्षम्य अपराध झाला आहे. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा"