हा तर वेळकाढूपणा, निर्णय आधीच येणे अपेक्षित होते, ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:05 AM2023-09-15T11:05:20+5:302023-09-15T11:05:39+5:30
Sunil Prabhu: आमच्या वकिलांनी अध्यक्षांना निर्णय घ्या, असे सांगितले. परंतु, शिंदे गटाने वेळकाढूपणा केला, असा आरोप ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला.
मुंबई - विधानसभेचे आज न्यायालय झाले. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यांनी अपात्रतेबाबत निर्णय घ्या, असे सांगितले होते. तसेच सुनील प्रभू यांच्या व्हिपला मान्यता दिलेली होती. अध्यक्षांनी अपात्रतेबाबत निकाल द्यावा, असेही सांगितले होते. आमच्या वकिलांनी अध्यक्षांना निर्णय घ्या, असे सांगितले. परंतु, शिंदे गटाने वेळकाढूपणा केला, असा आरोप ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. आम्ही अध्यक्षांकडे तत्काळ निर्णय घ्यावा, असे प्रतिज्ञापत्र देणार आहोत. शेड्यूल १० प्रमाणे निर्णय आधीच येणे अपेक्षित होते, असेही ते म्हणाले.
शिवसेनेतील फुटीनंतर आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दुपारी १२:०० वाजता सुनावणीला सुरुवात केली. त्यावेळी ठाकरे गटाचे वकील असिम सरोदे यांनी अध्यक्षांना एकत्र सुनावणी घेत आजच निर्णय जाहीर करण्याची मागणी केली. मात्र, याला विरोध करीत शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी याचिकेसंदर्भातील कागदपत्रे मिळाली नसल्याने बाजू मांडणे कठीण असल्याचा दावा केला. अखेरीस शिंदे गटाचा हा दावा अध्यक्षांनी ग्राह्य धरला आणि त्यानुसार पुढील सुनावणीसाठी १७ दिवसांचा कालावधी जाहीर केला.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व निर्देश स्पष्टपणे दिले असतानाही जाणूनबुजून विलंब केला जात आहे. एकूण ४१ याचिका अध्यक्षांसमोर आहेत. या सर्व याचिकांचा विषय एकच आहे. त्यामुळे सगळ्या याचिका या एकत्रितपणे चालवाव्यात. पक्षाचा आदेश झुगारून जे बाहेर पडले आहेत. त्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने आधीच अपात्र ठरवले आहे.
- असिम सरोदे, ज्येष्ठ विधिज्ञ
आरोपांना उत्तर देणार नाही : राहुल नार्वेकर
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी कोणत्याही आरोप - प्रत्यारोपांवर भाष्य करणार नाही. मी सध्या न्यायिक अधिकारांतर्गत काम करतोय. त्यामुळे माझ्यासमोर जी सुनावणी होत आहे, त्यासंदर्भात बाहेर कुठलेही भाष्य करणे मला उचित वाटत नाही. ज्यांना बाहेर आरोप करायचे आहेत, त्यांनी खुशाल करावेत. मी विधानसभा नियमांनुसार आणि घटनेत ज्या तरतुदी आहेत, त्यांच्या अनुषंगानेच काम करणार, अशी प्रतिक्रिया विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
व्हिपबाबत कारवाई का नाही? : जाधव
३० जून २०२२ ला शिवसेनेतील गट फोडून भाजपने सरकार बनवले. त्यांनतर आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे शेड्यूल १० प्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी केली. परंतु, अध्यक्षांनी सातत्याने वेळकाढूपणा केला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की, भरत गोगावले व्हिप नाहीत. परंतु, अध्यक्षांनी त्यावरदेखील कारवाई केली नाही, अशी खंत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
विजय कुणाचा हे कळेलच : गोगावले
वेळकाढूपणा आम्ही नाही तर ते करत आहेत. सगळी कागदपत्रे आम्हाला दिली पाहिजे होती. आता अध्यक्षांनी त्यांना दस्तऐवज द्यायला सांगितले आहे. नंतर त्यावर आम्ही उत्तर देऊ, असे आमदार योगेश कदम आणि सुहास कांदे यांनी सांगितले. कुणीही वेळकाढूपणा करत नाही. विजय कुणाचा होईल हे कळेलच, त्यांना कल्पना आहे, अशी टिपण्णी भरत गोगावले यांनी केली.