अशी बदलेल मुंबईतील लोकल-बेस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:34 PM2024-01-01T12:34:07+5:302024-01-01T12:36:26+5:30

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेमार्गावर क्षमतावाढीची अनेक कामे सातत्याने सुरू असली तरी पुरेशा निधीची कमतरता आणि अतिक्रमणे काढून टाकण्यात होणारा विलंब यामुळे कामे रेंगाळत असतात. त्यासाठीच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासाची कितीही गैरसोय झाली तरी मुंबईकरांनी ती निमूटपणे सहन केली आहे. 

This is how the local-best in Mumbai will change | अशी बदलेल मुंबईतील लोकल-बेस्ट 

अशी बदलेल मुंबईतील लोकल-बेस्ट 

रविकिरण देशमुख, वृत्तसंपादक

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उपनगरी रेल्वे आणि बेस्ट यांचे महत्त्व असाधारण आहे. याची कारणे दोन - उपनगरी रेल्वेप्रवास वेगवान आहे, रस्ते वाहतुकीपेक्षा अधिक किफायतशीर आणि वेळेची बचत करणारा आहे. तसेच अतिशय दूरवरच्या उपनगरांना आणि मुंबई महानगर प्रदेशातील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, नवी मुंबईच्या आजूबाजूचा परिसर आणि वसई-विरार येथील नागरिकांना त्याशिवाय पर्याय नाही. 

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेमार्गावर क्षमतावाढीची अनेक कामे सातत्याने सुरू असली तरी पुरेशा निधीची कमतरता आणि अतिक्रमणे काढून टाकण्यात होणारा विलंब यामुळे कामे रेंगाळत असतात. त्यासाठीच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासाची कितीही गैरसोय झाली तरी मुंबईकरांनी ती निमूटपणे सहन केली आहे. 

मुंबई रेल विकास कार्पोरेशनच्या माध्यमातून एमयूटीपी २ हा प्रकल्प राबविला जात आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गांना जोडणाऱ्या काही प्रकल्पांची कामे अतिक्रमणांच्या अडथळ्यांमुळे रेंगाळली आहेत. त्यातील ऐरोली-कळवा यांना जोडणारा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. ऐरोली-कळवा प्रकल्पांतर्गत दिघा येथील हॉल्ट स्टेशन पूर्ण झाले असून ते कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे.   

पश्चिम रेल्वेच्या सेवेच्या विस्तारासाठी एमयूटीपी २ अंतर्गत मुंबई सेंट्रल-बोरिवली दरम्यानची सहावी लाइन नोव्हेंबर २३मध्ये खार रोड- गोरेगाव (८.८ किमी) दरम्यान अंशत: कार्यान्वित करण्यात आली. त्याचा दुसरा टप्पा गोरेगाव- बोरिवली २०२४ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.    मुंबई रेल विकास कार्पोरेशनतर्फे विविध ठिकाणी रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा म्हणून १४ पादचारी पूल, एक लिंक वे, एक रेल्वेमार्ग आणि एक भुयारी मार्ग २०२४ मध्ये सार्वजनिक वापरासाठी कार्यान्वित करण्याची योजना आहे.

खार येथील एक डेक निर्माणाधीन आहे तर दुसरा कार्यान्वित करण्यात आला आहे. तर खार येथील स्टेशन सुधारणेचे पूर्ण काम (आणखी दाेन एस्केलेटर आणि तीन लिफ्टसह) २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

मुंबईतील सातवे टर्मिनस जोगेश्वरी येथे आकारास येत आहे. मुंबई सेन्ट्रल, वांद्रे आणि दादर टर्मिनसवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांचा भार हलका करण्यासाठी हे टर्मिनस बांधण्यात येत आहे. त्याच्या कामाला नव्या वर्षांत सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. मेल एक्स्प्रेससह लोकल गाड्यांसाठीही हे टर्मिनस उपलब्ध करण्याचा विचार आहे. 

कुर्ला ते परळदरम्यान पाचवा-सहावा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे. त्यात सायन उड्डाणपुलाचे खांब अडथळा ठरत आहेत. हा अडथळा दूर होऊन नव्या वर्षात हे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. 

कोस्टल रोडचा एक टप्पा नव्या वर्षात लोकसभा निवडणुकांपूर्वी मुंबईकरांना वापरता येईल, असे नियोजन सुरू आहे. बहुप्रतीक्षित मेट्रो तीनचा आरे ते वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणारा टप्पाही याचदरम्यान मुंबईकरांच्या सेवेत येईल. स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्ग- विक्रोळी यांना जोडणारा मेट्रोमार्ग वेगाने पूर्णत्वास जात आहे. हा मार्गही नव्या वर्षात सुरू होऊ शकतो. त्यामुळे घाटकोपर- वर्सोवा मेट्रोप्रमाणे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली जातील. 

शिवडी-न्हावा शेवा यांना जोडणारा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे उद्घाटन येत्या १२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. 

मुंबई महानगरात बेस्ट सेवेचा वापर लाखो प्रवासी करतात. कोविडच्या काळात विस्कळीत झालेली ही सेवा नव्या चकचकीत इलेक्ट्रिक बसमुळे मार्गावर येत असल्याचे दिसत आहे; पण अद्याप बरेच मार्ग बेस्टने पूर्ववत केलेले नाहीत. अनेक बसमार्ग आजही खंडित अथवा बंद केलेलेच आहेत. त्यात भर पडली आहे ती मेट्रो मार्गांच्या कामांची. या कामांमुळे अनेक रस्ते खोदून ठेवलेले असल्याने बस पूर्वीच्या संख्येने चालवल्या जात नाहीत. एक तर त्या दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत अथवा अर्धवट मार्गावर चालविल्या जात आहेत. नवीन वर्षात बेस्टच्या सर्व गाड्या इलेक्ट्रिक एसी बस गाड्यांमध्ये परावर्तित करण्याचा मानस आहे.

सध्या ५० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत धावत आहेत. एकूण ९०० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस सेवेत येणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी तब्बल ८६ वर्षे मुंबईकरांची सेवा करून जुन्या डबलडेकर बस सेवेतून हद्दपार झाल्या. पहिली डबलडेकर बस ८ डिसेंबर १९३७ मध्ये सुरू झाली. नवीन वर्षात दाेन हजार सिंगल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा बेस्ट उपक्रमाचा मानस आहे.

Web Title: This is how the local-best in Mumbai will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.