Join us

हे तर महाराष्ट्राचे वैरी... कर्नाटक प्रचारावरुन संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 9:13 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत.

मुंबई - कर्नाटकात निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून १० मे रोजी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. त्यासाठी, भाजपकडून प्रचारासाठी मोदी फौज मैदानात उतरवण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर, मुख्यमंत्री शिंदेही लवकरच भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार होते. त्यातच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरुद्ध प्रचार केल्यास मुख्यमंत्री शिंदेंचा दुटप्पीपणा उघड होईल. म्हणून, त्यांनी या उमेदवारांविरुद्ध प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून अप्रत्यक्ष मदत होत असल्याचा आरोप करत कर्नाटक दौऱ्यावरुन खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर खोचक शब्दात टीका केलीय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच.. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच असा डांगोरा ते  रोज पिटत आहेत. आता काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री  बॉम्माई म्हणतात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं उचापती आहेत त्यांना आम्ही धडा शिकवू..आणि शिंदे त्याच बॉम्माईच्या पखाली वाहत आहेत. शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही. उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  

सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! हे तर महाराष्ट्राचे वैरी, असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केलीय. बाळासाहेबांनी या कृत्या बद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती.. एकशे पाच हुतात्म्यांशी ही बेइमानी आहे.. महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील!जय महाराष्ट्र ! असे ट्विट संजय राऊत यांनी केलंय. 

समितीविरोधात शिंदे प्रचार करणार नाहीत

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात येऊ नये, अशी मागणी समितीने महाराष्ट्रातील विविध नेत्यांना पत्र पाठवून केली होती. तसेच समितीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आदींची भेट घेऊन समिती उमेदवारांबाबत माहिती दिली होती. मात्र, राज्यात भाजपसोबत सत्तेत असल्याने मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंची गोची झाली. त्यामुळे, मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाभागात प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे उडपी आणि मंगळूर येथे प्रचार सभा घेणार होते.

दरम्यान, काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसचे (Congress) नेते समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होत आहेत. त्याला विरोध होऊ लागला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींना कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला आहे. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामुख्यमंत्रीकर्नाटक राजकारण