'आव्हान द्यायची ही वेळ नाही'; संजय राऊतांच्या विधानावर आता भास्कर जाधवही संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 02:08 PM2022-06-24T14:08:31+5:302022-06-24T14:09:04+5:30
आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून सांगतो, आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे.
राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत हे कमालीच्या आक्रमक पावित्र्यात दिसले. आम्ही जिंकणार, विधानसभेत विश्वास ठरावही जिंकू. या मंडळींनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांच्या या विधानावर आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ही आव्हान द्यायची वेळ नाही. त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे मतभेद कमी होतील, नेहमीच आव्हान देऊन काही होत नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.
आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे, असं भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी तेव्हाही सांगितलं होतं की, आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका, शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले. मात्र आपल्या कोट्यातील ३ मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली?, असा सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मुंबई- आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे, असं भास्कर जाधव म्हणाले. pic.twitter.com/gD9wdSMoGw
— Lokmat (@lokmat) June 24, 2022
दरम्यान, आता आमची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. मुख्यमंत्रीही या बैठकीत होते. संपूर्ण तयारी झाली आहे. आता तुम्ही याच, आमचं चॅलेंज आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. हे सरकार पुढची अडीच वर्षं सत्तेत राहील. तसेच पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.