मुंबई: देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाचा विजय निश्चित असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत आलेले निकाल आणि ट्रेंड पाहता, यूपीसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येताना दिसत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. त्यामुळे ४१ ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला किती मतदान झालं? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. यूपी, गोवासारख्य राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी प्रचार केले.
उत्तर प्रदेश निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक मतदारसंघात शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं. याठिकाणी नागरिकांनी शिवसेनेला नाकारलं आहे. यावर कोणत्याही निवडणुकीत पराभव हा अंतिम नसतो, ती एक सुरुवात असते, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. लढाई संपली असा अर्थ होत नाही. उत्तर प्रदेशात आम्ही जिथे लढलो, ती आमची सुरुवात आहे. लोकांसाठी काम करत राहू, असं संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपाने विजय पचवायला हवा. विजयाचं अजीर्ण व्हायला नको. सुडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, असा टोला देखील संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.
दरम्यान, सदर निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अत्यंत वाईट पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. पंजाबमधील लोकांना आणखी एक पर्याय मिळाला आणि त्यांनी आपला निवडले. भाजपचा विजय हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचाही विजय आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.