Join us

‘एवढे हतबल दिलीप वळसे-पाटील पहिल्यांदाच पाहिले, सीबीआय चौकशी नाकारल्यावर फडणवीस संतापले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:19 PM

Devendra Fadanvis News: देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचे पेन ड्राईव्ह सभागृहाला देत खळबळ उडवली होती. त्यानंतर आज या विषयावर सभागृहात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र गृहमंत्र्यांच्या या घोषणेबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 मुंबई - राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत आहे. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचे पेन ड्राईव्ह सभागृहाला देत खळबळ उडवली होती. त्यानंतर आज या विषयावर सभागृहात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र गृहमंत्र्यांच्या या घोषणेबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली. तसेच विरोधी सभासदांसह सभात्याग केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे दिलीपरावांना मी २२ वर्षे सभागृहात पाहत आलोय. मात्र एवढे हतबल दिलीप वळसे पाटील मी पहिल्यांदाच पाहिले आहेत. तुम्ही वीक विकेट असताना नाईट वॉचमनसारखे खेळलात तरी तुमचे अभिनंदन करतो. मात्र मी सभागृहाच्या दृष्टीस आणू इच्छितो की, एनआयएने बॉम्बस्फोटाला एफआयआर केलेला नाही. एफआयआर मनी लाँड्रिंगचा झाला आहे. नवाब मलिकांबाबतची केस कोर्टाने प्राथमिकदृष्ट्या मान्य केलीय. पण तुम्हाला त्यांना वाचवावंच लागेल.

अनिल देशमुखांवर कुणी एफआयआर केलीय. विरोधी पक्षांनी नाही. एजन्सींनी नाही, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर झालेली आहे. तसेच बीएचआर प्रकरणात मुख्य आरोपीचे वकील हे प्रवीण चव्हाण होते. दरम्यान, मी केलेल्या आरोपांवर गांभीर्याने पावलं उचलाल, असे वाटत नाही. मात्र सरकार कारस्थान करत असताना, त्याचे पुरावे दिल्यानंतर सरकारच्या अखत्यारीत येणारं पोलीस खातं चौकशी करू शकेल असं वाटत नाही. तुमच्याविरोधातील चौकशी या राज्यातील पोलीस, सीआयडी करूच शकत नाही. मला महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा मला आहे. पण १०० टक्के चांगले आहेत, असं नाही.

मुंबईतली अवस्था तर अशी आहे. इथे यादी प्रसिद्ध झाली आहे. संजय पांडे आले आहेत. आता पहिलं प्रवीण दरेकर, मग दुसरा, तिसरा अशी कारवाई होईल, असे दावे केले जाताहेत. पुढच्या दोन तीन दिवसांत प्रवीण दरेकरांवर एफआयआर होणार हे आम्हाला माहिती आहे. आम्ही मुकाबला करू. मात्र या ठिकाणी एवढा पुरावा दिला असताना, राज्य सरकारविरोधात आमची भूमिका असताना, हे सरकार योग्य चौकशी करू शकत नाही. म्हणून आम्ही सीबीआय चौकशीवर ठाम आहोत. त्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ, असेही फडणवीस म्हणाले.

आमची मागणी आहे की हे प्रकरण सीबीआयला गेलं पाहिजे. तुम्ही ते सीबीआयकडे दिलं तर आनंदच होईल. मात्र तुम्ही ते प्रकरण सीबीआयकडे देत नसल्याच्या निषेधार्थ आम्ही सभात्याग करतो, असे म्हणत फडणवीस आणि भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसदिलीप वळसे पाटीलविधानसभाराजकारण