मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या पक्षाला वापरता येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. मात्र, अजित पवार गटाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. तसा कुठलाही निर्णय नसल्याचे अजित पवार गटाने स्पष्ट करत यासंबंधीचे निवडणूक आयोगाचे पत्र सादर केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्षद्वीप मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यात आला. पहिल्या टप्प्यात येथील मतदान होत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बुधवारी उशिरा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, संबंधित उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. परंतू अजित पवार गटाने हा दावा खोडून काढला आहे.
तसा कुठलाही आदेश किंवा नियम नसल्याचेही अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. तसेच, निवडणूक आयोगाचे पत्र सुद्धा सादर केले आहे. यामध्ये निवडणूक आयोगानेही पत्रात लक्षद्वीप येथील उमेदवाराला घड्याळ चिन्ह वापरता येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, लक्षद्वीपमधून अजित पवार यांच्याकडून युसूफ टी.पी. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार मोहम्मद फैजल यांचे आव्हान आहे. १९ एप्रिल रोजी येथे पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, येथे भाजपकडून अजित पवार यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे.