Join us

'हा महामोर्चा म्हणजे पहिलं पाऊल, शेवटचं नाही, यापुढे…’ छगन भुजबळांचा भाजपाला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:46 PM

Chhagan Bhujbal: हा महामोर्चा हे आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे. ते शेवटचं पाऊल नाही. यापुढे त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांसह राज्याती इतर महापुरुषांच्या भाजपा नेत्यांकडून झालेल्या अपमानावरून महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने महामोर्चाचं आयोजन केलं असून, त्यामध्ये लाखो कार्यकर्ते आणि प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चादरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी भाजपाला इशारा दिला आहे. हा महामोर्चा हे आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे. ते शेवटचं पाऊल नाही. यापुढे त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची प्रसिद्धी होऊ नये म्हणून लोकांचं आणि मीडियाचं लक्ष विचलित करण्यासाठी सगळा खटाटोप भाजपा करतोय. माफी त्यांनी मागायची आहे. चुका त्यांनी केल्या आहेत. राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत. सरकार चुका करतंय, आम्ही का माफी मागायची हा सर्व लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा देखावा आहे, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

महापुरुष, हे आमची दैवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू,  आंबेडकर ही आमची दैवतं आहेत. त्यांचा अपमान होतोय. तो अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. ते आजही सर्वांच्या हृदयस्थानावर आरुढ आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत चाललो आहेत. ज्याप्रमाणे गणपतीची आदरानं मिरवणूक काढतो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना सोबत घेऊन चाललो आहोत. 

यावेळी भुजबळांनी भाजपाच्या आंदोलनावरही टीका केली. ते म्हणाले की, भाजपा आंदोलन करून महामोर्चाला छेद देऊ शकत नाही. जनतेला सर्व काही ठावूक आहे. हा मोर्चा आधी कोणी जाहीर केला, कशासाठी जाहीर केला. गेला महिना दीडमहिना राज्यात काय प्रकार सुरू आहे, हे जनतेला माहिती आहे, असेही भुजबळ म्हणाले.

हा महामोर्चा हे आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे. हे शेवटचं नाही. याच्यापुढे याची तीव्रता वाढत जाणार. याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील. महागाई, बेरोजगारी, राज्याबाहेर जाणारे उद्योग आणि महापुरुषांचा अपमान, हे विषय विधान सभेत आणि विधान परिषदेत निश्चितपणे उपस्थित होतील आणि त्याच्यावर सर्वांचं भाष्यही होईल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.  

टॅग्स :छगन भुजबळमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेस