'छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अंत पाहू नका'; शिंदे गटाचा कर्नाटकाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:16 PM2022-12-06T15:16:19+5:302022-12-06T15:17:09+5:30
शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
मुंबई- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे.
सदर घटनेवरुन राज्यातील वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. चिथावणी करणारे कृत्य कुठल्याही राज्याने करू नये, महाराष्ट्रातील जनता ही संयमी आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो, असं उदय सामंत म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जनतेचा संयम सुटला नाही पाहजे, याची दक्षता कर्नाटकने घेतली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राचा अतं पाहू नका, असा इशारा देखील उदय सामंत यांनी दिला आहे.
दरम्यान, कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत. कार्यकर्ते कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत. ट्रकच्या टपावर चढून आंदोलन करत आहेत. कर्नाटकच्या या आगळीकीवर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
VIDEO: कन्नड रक्षण वेदिकेचा महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला, महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी pic.twitter.com/gHNFTvqhLd
— Lokmat (@lokmat) December 6, 2022