Join us

'हा' माणूस कितीतरी टनानं सोनं गोळा करतोय, याची संस्था...? पृथ्वीराज बाबांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 4:44 PM

विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली.

मुंबई - राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेनातील आजचा दिवस सभागृहातील संभाजी भिडेंवरुन गाजला. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन काँग्रेस आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला. तसेच, संभाजी भिडेंवर कारवाईची मागणीही केली. यावेळी, सरकारच्यावतीने बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजी असा उल्लेख केल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला. तसेच, संभाजी भिडेंच्या संस्थेचा विषयही विधानसभेत काढला. हा माणूस सोनं गोळा करत आहे, असे म्हणत आमदार चव्हाण यांनी भिडेंच्या संस्थेच्या ऑडिटवर प्रश्न उपस्थित करत चौकशीही मागणीही केली. 

विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर, फडणवीसांनी निवेदनही सादर केले. मात्र, भिंडेंकडून सोनं मागण्यात येत आहे, मग त्यांच्या संस्थेची नोंदणी आहे का? असा सवाल चव्हाण यांनी विचारला. मी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केल्यानंतर मला फोन आणि ई-मेलवरुन धमक्या आल्या. या, धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली, तो जामिनावर सुटला. समाजासाठी काम करत असताना अशा धमक्या आम्हाला येतात, त्याला आम्ही घाबरत नाही. पण, आमच्या अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. मग, या लोकांना धमकी देण्यासाठी कोणीतरी प्रवृत्त करत आहे का, यामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत म्हटले. 

संभाजी भिडे फ्रॉड माणूस आहे, याची डिग्री काय आहे, त्याने कुठे शिक्षण घेतलंय, हा प्राध्यापक कुठे होता? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, हा माणूस सोनं गोळा करत आहे. आपल्या कायद्याप्रमाणे कुठल्याही संस्थेला वर्गणी गोळा करायची असेल तर त्या संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते, त्याचा हिशेब द्यावा लागतो. मात्र, हा माणूस कितीतरी टनाने सोनं गोळा करत आहे, प्रत्येकाकडून १ ग्रॅम सोनं घेत आहे. लोकांची आणि तरुणांची दिशाभूल करत आहे. ऐन परीक्षेच्यावेळी काहीतरी गडकिल्ल्याची मोहीम काढतो. बहुजन समाजाची मुलं कुठेतरी फरफटत जावीत, हा त्याचा उद्देश आहे, असा आक्रमक पवित्रा पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत घेतल्याचं पाहायला मिळालं.