"ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं"; आव्हाडांनी अण्णा हजारेंचा फोटो शेअर केला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:50 AM2023-10-05T10:50:28+5:302023-10-05T10:51:53+5:30
आव्हाड यांच्या पोस्टमधून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या धोरणावर ते हल्लाबोल करतात. मात्र, यावेळी, आव्हाड यांनी थेट ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंवरच निशाणा साधला आहे. अण्णा हजारेंचा फोटो शेअर करत, ह्या माणसानेच देशाचं वाटोळं केलं, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, आव्हाड यांच्या पोस्टमधून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये मोठं जनआंदोलन उभारलं होतं. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर त्यांनी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन उभारुन लोकपाल कायदा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, देशभरात तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध वातावरण तयार झालं. त्यानंतर, नरेंद्र मोदींच्या कामाची प्रशंसा करत भाजपने देशभरात त्यांच्या नावाचा जयजयकार केला. अखेर मोदींच्या नेतृत्त्वात भाजपने २०१४ साली निवडणुका लढवल्या आणि बहुमताचा आकडा गाठत देशात मोदी सरकार स्थापन झालं.
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023
टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही pic.twitter.com/hDLIsSW8g9
२०११ साली जनआंदोनलन केलेल्या अण्णा हजारेंनी भाजपचं सरकार आल्यानंतर तेवढ्या तीव्रतेनं आंदोलन केलं नाही. किंवा त्यांच्या आंदोलनालास आता तसा प्रतिसादही मिळत नाही, अशी टीका वारंवार त्यांच्यावर होते. तसेच, देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. तरीही अण्णा हजारे शांत का आहेत, आजही प्रशासकीय यंत्रणांमध्ये चिरीमिरी दिल्याशिवाय कामच होत नाही. तरीही अण्णा हजारे आंदोलन का करत नाहीत, असा सवाल अनेकदा नेटीझन्सकडून विचारला जातो. सोशल मीडियावर अण्णांना ट्रोलही केलं जातं. त्यातच, आता जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप करत कडक शब्दात टीका केलीय. टोपी घातल्याने कोणी गांधी होत नाही, असेही ते म्हणाले.