'इतके हे मंत्री निर्ढावलेले आहेत'; संभाजीराजेंनीच केली आरोग्यमंत्र्यांची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:32 AM2023-03-28T11:32:38+5:302023-03-28T12:04:51+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत.
मुंबई/धाराशिव - राज्याचे आरोग्यमंत्रीतानाजी सावंत हे राज्यातील आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबवत असल्याचं सांगतात. नुकतेच, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी औषधे आणि वैद्यकीय वस्तु खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगितले. मात्र, भूम-परंडा-वाशी या त्यांच्याच मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी यासंदर्भात ट्विट करुन आरोग्यमंत्र्यांची पोलखोल केलीय.
राज्याचे आरोग्यमंत्रीतानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला. तरीदेखील परिस्थिती "जैसे थे" आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत, असे म्हणत संभाजीराजेंनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, भूममधील सरकारी आरोग्य केंद्रातील घाणीचं साम्राज्य आणि रुग्णांची दूरवस्था दिसून येत आहे. मी जर स्वत: डॉक्टर असतो तर राजीनामा देऊन मोकळा झालो असतो, नको बाबा ही नोकरी... असेही संभाजीराजे या व्हिडिओत म्हणत असल्याचे दिसत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती "जैसे थे" आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत. pic.twitter.com/aJCElQyW7u
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 28, 2023
कम्प्युटर धुळ खात पडले आहेत, इन्फ्रास्टकरच नाहीये, सगळीकडे घाण दिसून येतेय. डॉक्टर नाहीत, लॅबमध्येही कुणीही नाही, एम्बुलन्ससाठी ड्रायव्हर नाहीत, असेही संभाजीराजेंनी शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. १ महिन्यांपूर्वी ही परिस्थिती होती, जी आजही जैसे थेच आहे.