Join us  

"ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या", वर्षा गायकवाडांचे CM शिंदेंना अनेक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 3:10 PM

Mumbai News : मुंबई उपनगरामध्ये मॅनहोल उघडा ठेवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत.

Varsha Gaikwad Eknath Shinde : अंधेरी एमआयडीसी परिसरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. घरी जात असताना महिला झाकण काढलेल्या मॅनहोलमधून खाली पडली. शोध घेऊन बाहेर काढेपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला. मॅनहोल न बंद करण्यात आल्याने झालेल्या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले. (Varsha Gaikwad Eknath Shinde) 

विमल गायकवाड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सीप्झ मेट्रो लाईन ३ जवळ उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये विमल गायकवाड पडल्या. त्यांना काही तासानंतर बाहेर काढण्यात आले, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.  

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

"महाभ्रष्ट आणि अकार्यक्षम शिंदे सरकारमुळे गुन्हेगारी फोफावून निष्पाप लोक बळी जातच आहेत. पण आणखी एक मृत्यूचा सापळा यांनी रचला असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे एका मुंबईकराला आपला जीव गमवावा लागला आहे. ४५ वर्षीय विमला गायकवाड या महिलेचा काल रात्री उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. हा अपघात नाही;  ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या आहे", असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. 

"विमला गायकवाड यांना जीव का गमवावा लागला?"

"आमचा थेट प्रश्न आहेत की, मॅनहोल उघडे का ठेवण्यात आले होते? त्याठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सूचना फलक का बसवण्यात आले नव्हते? पावसाळ्यापूर्वी मॅनहोल का झाकले गेले नाहीत? मान्सूनपूर्व कामे आम्ही कसे करतो आणि मी स्वतः तिथे सहभाग कसा घेतो, हे सारे चमकोगिरी दृश्य दाखवण्यात मुख्यमंत्री महोदयांना फार रस आहे. मुख्यमंत्री महोदय खरंच तुम्ही तेवढे कार्यतत्पर आहात का? तसे असेल तर मग विमला गायकवाड यांना जीव का गमवावा लागला?", असे सवाल वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.   

"एका मुंबईकराने आपला नाहक जीव गमावला आणि या घटनेला हे सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि अन्य संबंधित प्रशासकीय अधिकारी या दुर्घटनेला जबाबदार आहेत. सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.  कामातील उदासीनता आणि निष्काळजीपणाची हद्दच झाली आता.. पुरे", असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

"मुख्यमंत्री महोदय, तुमच्या पोकळ दाव्यांमुळे आता सत्य लपून राहणार नाही. मुंबईकर घडल्या घटनांचा हिशोब मागताहेत, आणि ते आताच मागताहेत! त्वरित उत्तर द्या", असे म्हणत वर्षा गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. 

टॅग्स :मुंबईवर्षा गायकवाडएकनाथ शिंदेमुंबईत पावसाचा हाहाकार