लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. कालच ते दिल्लीला गेले होते. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी टीका करताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हे अल्पायुषी, थोड्या दिवसांचे सरकार आहे, अशा शब्दांत शिंदे गटावर निशाणा साधला.
वरळी येथील जांबोरी मैदान येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा मिळत आहे. मुंबईने देशाला मार्ग दाखवला आहे. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजेच शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे गटातच भांडणे लागली असल्याचा दावा आदित्य यांच्याकडून करण्यात आला. भाजपचे लोक आमच्याकडे येतात आणि आमच्या हातात त्यांचे घोटाळे देतात. मी लावालावी करत नाही. मी जे आहे ते खरंच बोलतो, असे ठाकरे म्हणाले.
जी-२० ची बैठक होती. मुख्यमंत्री या राजदूतांना भेटणार होते. मात्र बरोबर एक दिवसआधी निर्भया फंडातून घेतलेल्या गाड्या ४० गद्दारांच्या ड्यूटीवर लावण्यात आल्या होत्या, अशी बातमी वर्तमानपत्रात कशी येते असा सवाल करताना भाजपाकडून शिंदे गटाच्या कथित घोटाळ्यांची माहिती दिली जाते, असा दावा त्यांनी केला. हा थोड्या दिवसांचाच खेळ आहे. त्यांचा वापर केला जात आहे. त्यांचा शेवटचा वापर आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह घेण्यासाठी झाला, असेही ते म्हणाले. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव यांचीही भाषणे झाली.