मुंबई: केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या मेरी माटी मेरा देश या अभियान अंतर्गत सेल्फी विथ मेरी माटी या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राबवलेल्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते.
विक्रम वीरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अभियान देशभरात राबविण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून सेल्फी विथ मेरी माटी अभियानाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली अभूतपूर्व भेट असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
देशभावनेचे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सुरुवातीपासून आघाडीवर होता. देश प्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 'जी २०' चे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला, ही अभिमानाची बाब असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केले. तसेच सदर उपक्रमामध्ये ४० विद्यापीठातील ७ हजार महाविद्यालयातील २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अभिनंदन करून २०४७ पर्यंत देश एक विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी युवकांना केले. तसेच यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक प्रकाशनही संपन्न झाले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक आणि ऑडिओ बुकचे यावेळी प्रकाशन झाले याचा आनंद आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात, नाटक, कथा, कादंबरी, लोककथा, प्रवासवर्णन आदी लेखन केले. त्यांच्या साहित्याचे भारतीय आणि विदेशी भाषेत सुद्धा अनुवाद झाले आहे. त्यांचे साहित्य पुनर्मुद्रीत करून ई-बुक तयार केल्याबद्दल राज्यपालांनी समितीचे अभिनंदन केले. लोकशाहिरांचे साहित्य वाचण्याचे आणि देशातील लोकांची सेवा करण्याचे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.