मुंबई : विधान परिषदेतील या विजयाने चांगली सुरुवात झाली आहे. विरोधकांना लोकसभेमध्ये जी सूज आली होती ती सूज आता उतरली आहे. हा विजय विधानसभेतील विजयाची नांदी आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आम्हाला साथ देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे नऊही उमेदवार निवडून आले आहेत. आम्हाला आमची मते तर मिळालीच; पण महाविकास आघाडीची मतेही आमच्याकडे आली आहेत. एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल.
माझी बारा मते मला मिळाली - जयंत पाटील
माझी बारा मते मला मिळाली. काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटली. जाऊदे आता नको बोलायला, अशी प्रतिक्रिया शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पराभवानंतर व्यक्त केली.
विजय उभारी देणारा
महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा विजय कार्यकत्र्याच्या मनाला विलक्षण उभारी देणारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा विजय प्राप्त झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा शंखनाद या यशाने केला - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीवेळी जे कोणी बदमाश होते, त्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला. त्यांच्यावर आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावला होता. जे कोणी बदमाश आहेत, ते आता आमच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत. त्यामुळे अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढले जाईल, त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल, दुसऱ्यांदा कोणी मते फोडण्याची हिंमत करणार नाही -नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष