Join us  

यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 6:15 AM

यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केला. मंत्री गोयल यांचे रविवारी कांदिवलीत अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ विशद करणारे व्याख्यान झाले.

यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. हा अर्थसंकल्प केवळ ५ वर्षे सत्तेचे किंवा निवडणुकीचे उद्दिष्ट ठेवून बनवलेला नसून, हा देशाच्या विकासाचा प्रत्येक टप्पा लक्षात घेऊन, दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून बनविण्यात आला. अर्थसंकल्पात राज्याला काही मिळाले नाही, असे नाही. विकासाच्या योजना देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीनेच त्याची मांडणी केलेली आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविणे, रोजगार-कौशल्य विकास, सामाजिक न्याय, उत्पादन-सेवा उद्योग, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधांची निर्मिती, आदी सर्व घटकांचा समावेश अर्थसंकल्पात आहे. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या विळख्यात असूनही, भारत विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे, असेही गोयल म्हणाले. 

या व्याख्यानाला दीड हजारांहून अधिक नागरिक तसेच आ. प्रवीण दरेकर, माजी खा. गोपाळ शेट्टी, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, आ. मनीषा चौधरी आणि भाजपच्या उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :पीयुष गोयलअर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019