Join us

यावर्षी एमटीएचएल, भुयारी मेट्रोचे स्वप्न अधुरेच! आगामी वर्षात एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 2:36 PM

या प्रकल्पांसाठी आता २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. भारतातील मोठा पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी ते न्हावा शेवा एमटीएचएल पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबई : मुंबईसह महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या एमएमआरडीएने पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी एमएमआरडीएने हे प्रकल्प हाती घेतले. त्यासाठी युद्धपातळीवर काम देखील केले; मात्र शिवडी न्हावा शेवा पूल, कुलाबा ते सिप्झ मेट्रो ३ मार्गिका व इतर काही प्रकल्प पूर्ण करण्याचे डिसेंबर २०२३ चे उद्दिष्ट एमएमआरडीएला गाठता आले नाही. 

  या प्रकल्पांसाठी आता २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. भारतातील मोठा पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी ते न्हावा शेवा एमटीएचएल पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे २१.८ किमी लांबीचा हा मार्ग पुढच्या वर्षी सुरू होणार असून आतापर्यंत ९८ टक्क्यांहून अधिक या प्रकल्पाचे काम झाले. या प्रकल्पासाठी सुमारे १८ हजार कोटी खर्च करण्यात येत असून २१.८ किमीपैकी १६ किमी मार्ग हा समुद्रातून जाणार आहे. 

भूमिगत मेट्रोएमएमआरसीएल तर्फे कुलाबा ते सिप्झ दरम्यान मेट्रो ३ मार्गिका उभारली जात आहे. मुंबईतील पहिली वहिली भुयारी मेट्रो म्हणून हा मेट्रो मार्ग ओळखला जातो. मेट्रो ३ चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्यात येणार होता; मात्र दिरंगाईने सुरू असलेले काम व कारशेडच्या अर्धवट कामामुळे मेट्रो ३ च्या कामाची डेडलाईन हुकली आहे. या मेट्रोचे कारशेड आरे कॉलनी येथे असून या ३३ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी ३३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

शिवडी वरळी एलिव्हेट मार्गवरळीहून थेट शिवडी न्हावाशेवा मार्गाला जोडण्यासाठी एमएमआरडीए मार्फत  शिवडी वरळी मार्ग उभारला जात आहे. या एलिव्हेटेड मार्गाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार होते मात्र हे काम भूसंपादनामुळे रखडले असून त्याची डेडलाईन देखील हुकली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या मार्गाच्या पूर्णत्वासाठी डिसेंबर २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे. ४.५ किमीचा हा मार्ग जमिनीपासून १५ ते २७ मीटर उंच आहे. 

- वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक प्रकल्प हाती घेतला. - या प्रकल्पांतर्गत मीरारोड  भाईंदरला दररोज २१८ दशलक्ष लिटर, तर वसई विरारला दररोज १८५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन एमएमआरडीएने ठेवले आहे या प्रकल्पासाठी १३२५.७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.- सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ साली हाती घेण्यात आले हा प्रकल्प याआधीच पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र हा प्रकल्प काही कारणास्तव रखडला. -  हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने डोळ्यासमोर ठेवले होते.  - मात्र या प्रकल्प पूर्तीसाठी आता जानेवारी उजाडण्याची शक्यता आहे.

मेट्रो २ बसुखकर प्रवासासाठी एमएमआरडीए अंधेरी पश्चिम ते मानखुर्द दरम्यान मेट्रो २ ब ही मार्गिका उभारत आहे. या मेट्रोचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या मार्गिकेवरील मंडाळे ते चेंबूर हा पहिला टप्पा २०२४ मध्ये वाहतूक सेवेत आणण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. 

दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘मेट्रो २ ब’अंतर्गत अंधेरी पश्चिम ते मंडाळे असा करण्यात येणार आहे. मार्गिकेसाठी मानखुर्द येथे ३१ हेक्टर जागेत कारशेड उभारण्यात येत आहे.

टॅग्स :फ्लॅशबॅक 2023मुंबईमेट्रोरेल्वे